प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विलीनीकरणाच्या तारखांचा उल्लेख आपण त्यावेळी का केला नाही आणि आताच का केला, यामागील राजकीय कारण आपण योग्य वेळी सांगेन, असे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीला अजितदादांनी आपल्याला विलीनीकरणाबाबत काहीही सांगितले नसल्याची भूमिका तटकरेंनी उघडपणे घेतली होती. मात्र, शरद पवार आजारी असल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते आणि प्रफुल्ल पटेल त्यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळच्या प्रसंगाचा तटकरेंनी नव्याने उल्लेख केला.
त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपण विलीनीकरणाचा विषय संपल्याचे सांगितले होते. मात्र, जर अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच विलीनीकरण झाले असते, या आपल्या दाव्याचा तटकरेंनी पुनरुच्चार केला. ‘मला त्यावेळीही विलीनीकरणाबाबत माहिती होती आणि आजही आहे; मात्र त्यावेळी तारखा सांगितल्या नव्हत्या आणि आता सांगितल्या आहेत,’ अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा विषय मागे पडला असून त्यावर कोणतीही चर्चा नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. सुळे यांच्या या भूमिकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनेही विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. सध्या केवळ माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भूमिकेवरही तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही होता, आजही आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेत कोणताही बदल होणार नसून, राज्यातील महायुतीचा घटक म्हणूनच पक्ष आपली पुढील वाटचाल करेल, असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात भूजल पातळीत मोठी घट; ८७ टक्के विहिरींचे पाणी गेले तळाला
- ‘अकबन’ चक्रीवादळाचा धोका: महाराष्ट्रात हवामान बदलणार, विदर्भ-मराठवाड्यात ४ दिवस पावसाचा अंदाज
- पहलगाम हल्ल्याच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’; सीबीआय-एनआयएची भीती दाखवून निवृत्त वकिलाचे ४ कोटी लुटले








