प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत गेल्यास आमची ताकद कमी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी ६० वर्षांनंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तो त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल, मात्र ते तसं करणार नाहीत असे मला वाटते, असे चव्हाण म्हणाले. शेवटी पक्ष त्यांचा असून निर्णयही त्यांचाच असेल. पण दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर ते तिकडे गेले, तर मात्र आमची ताकद थोडी कमी होईल, असे ते म्हणाले. तसेच असे घडल्यास देशात केवळ दोनच विचारधारा राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यातच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते, असा दावा केला होता.
तटकरे यांच्या या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अजित पवार गटाकडून राऊत यांचा हा दावा फेटाळून लावण्यात आला, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १२ फेब्रुवारीलाच विलिनीकरण झाले असते; सुनील तटकरेंचा मोठा दावा, हॉस्पिटलमधील भेटीचाही उलगडा
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांचा दावा खराच असावा; चर्चेचे साक्षीदार असल्याचं सुनील तटकरेंचं वक्तव्य
- भारताचा ८९ धावांवर खुर्दा; चौथ्या वनडेतील लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरचा संताप








