प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: सामाजिक आणि राजकीय आंदोलनांमधील एक परिचित चेहरा असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) नेत्या नेहा बोरा सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. “मी स्त्री नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी आपण ‘नॉन-बायनरी’ असल्याचे म्हटले आहे. त्या स्वतःला महिला किंवा पुरुष यांपैकी कोणत्याही पारंपरिक लिंगओळखीच्या चौकटीत मानत नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान याविषयी विचारले असता, लोकांमध्ये या विषयाची पुरेशी माहिती नसल्याने असे घडत असल्याचे त्या म्हणाल्या. अनेक जण त्यांना ‘ती’ किंवा आदरार्थी ‘ते’ असे संबोधतात. ‘नॉन-बायनरी’ व्यक्तींशी कसा संवाद साधावा, हे समजून घेण्यासाठी समाज आणि माध्यमांना अजून थोडा वेळ लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘नॉन-बायनरी’ व्यक्तींची ओळख ही ट्रान्सजेंडर समुदायापेक्षा वेगळी असते. यांची लैंगिक ओळख केवळ स्त्री किंवा पुरुष या दोन घटकांपुरतीच मर्यादित नसते. काही जण स्वतःला दोन्ही रूपात पाहतात, तर काही जण कोणत्याही लिंगभेदात न अडकता स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती मानतात. नेहा बोरा यादेखील स्वतःला स्त्री अथवा पुरुष या पारंपरिक ओळखीपेक्षा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतात.
मूळच्या उत्तराखंडच्या असलेल्या नेहा बोरा यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले असून, सध्या त्या जेएनयूमध्ये (JNU) पीएचडी करत आहेत. जंतरमंतरसह विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमधील त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे आणि ठाम भूमिकेमुळे देशभरात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
- दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर
- सुनील तटकरेंना ‘व्हिलन’ का ठरवताय? विलिनीकरणाच्या चर्चेवर आदिती तटकरेंनी दिली वडिलांची साथ








