छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर काल रात्री साडेअकराच्या सुमारास हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर शिरसाट यांनी पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी अटक करण्यात आलेल्या या तिघांची नावे आहेत.
या हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करणे, धमकी देणे, दमदाटी करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासोबतच मालमत्तेचे नुकसान करणे, शारीरिक इजा पोहोचवण्यासारखे कृत्य करणे तसेच समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणीही त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.
राज्याच्या मंत्र्याच्या घरावरच थेट हल्ला झाल्याने आमदार रोहित पवार यांनी गृहविभागावर सडकून टीका केली आहे. “सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला धक्कादायक असून, यातून गृहविभागाचे धिंडवडे उडाले आहेत. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचं घरच सुरक्षित नसेल, तर तिथं सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय?” असा खडा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पवार यांनी रात्री घडलेल्या या घटनेच्या तपशीलाबाबत सखोल तपासाची मागणी केली. तसेच, “सत्तेतील मित्रपक्षांसोबत कठपुतळीचा खेळ खेळणाऱ्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेची तरी गांभीर्याने दखल घ्यावी,” असा थेट निशाणाही त्यांनी साधला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यात पार्थ पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदारांनी दिले थेट उत्तर
- IND vs NZ : धोनीची निवृत्ती ते रोहित-विराटची दाणादाण; मॅट हेन्री ठरला टीम इंडियासाठी पुन्हा ‘काळ’
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल; साक्षीदाराची अट रद्द, दलालांना चाप








