प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: हिंदू धर्मात विवाह संस्काराला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह पार पडल्यानंतर चातुर्मासाची समाप्ती होईल. यासोबतच यंदाच्या लग्नसराईला पुन्हा एकदा दणक्यात सुरुवात होणार आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यामध्ये विवाहबंधनात अडकण्यासाठी केवळ ४ शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीला (शुक्रवार, २० नोव्हेंबर) भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. या काळात थांबलेली गृहप्रवेश आणि विवाहासारखी सर्व मांगलिक कार्ये यानंतर पुन्हा सुरू होतात. नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी २१, २४, २५ आणि २६ तारखेलाच पंचांगानुसार शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबरमधील लग्नाचा पहिला शुभ मुहूर्त शनिवार, २१ नोव्हेंबरला असून, तो सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी रेवती नक्षत्र असेल. यानंतर दुसरा मुहूर्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी (२५ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील. या काळात रोहिणी नक्षत्र असेल.
बुधवार, २५ नोव्हेंबरचा मुहूर्त हा या महिन्यातील विवाहाचा सर्वात मोठा मुहूर्त मानला जातो. हा मुहूर्त सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपासून ते २६ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र राहील. तर महिन्यातील शेवटचा मुहूर्त गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत मृगशीर्ष नक्षत्रात असेल.
वैदिक परंपरेत लग्नाची वेळ आणि तारीख निश्चित करताना पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांचा प्रामुख्याने विचार केला जातो. याशिवाय गुरु आणि शुक्र या ग्रहांची स्थिती, वधू-वरांचे कुंडली मिलन आणि मंगळदोष तपासूनच लग्नाची योग्य वेळ ठरवली जाते. अनुकूल ग्रहस्थिती आणि नक्षत्रांमध्ये लग्न केल्याने वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य लाभते, अशी मान्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







