प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: उस्मान ख्वाजाच्या ‘सँडपेपर गेट’ प्रकरणातील नव्या खळबळजनक दाव्यांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने केली आहे. हा वाद अद्याप मिटलेला नाही, असे सांगत सध्याचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याने या दाव्यांवर अद्याप मौन का बाळगले आहे, असा सवालही क्लार्कने उपस्थित केला आहे.
१० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या ‘सब्र’ (Sabr) या आत्मचरित्रात ख्वाजाने २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील चेंडू कुरतडण्याच्या (बॉल टॅम्परिंग) प्रकरणाबद्दल नवे खुलासे केले आहेत. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीत हा प्रकार घडण्यापूर्वीच, पोर्ट एलिझाबेथ (आताचे गकेबरहा) येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान चेंडूमध्ये फेरफार करण्याबाबत ऑस्ट्रेलियन संघात चर्चा झाली होती आणि संपूर्ण संघाला या योजनेची आधीच कल्पना होती, असा दावा ख्वाजाने केला आहे.
ख्वाजाच्या मते, दुसऱ्या कसोटीत कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने सँडपेपर वापरण्याची तयारी दर्शवली होती आणि त्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला रिव्हर्स स्विंग मिळवण्यात यश आले. केपटाऊन कसोटीत बॅनक्रॉफ्ट कॅमेरासमोर पकडला जाण्यापूर्वीच संघाला या कटाची माहिती होती. तसेच, केपटाऊनमध्ये आपण बॅनक्रॉफ्टच्या शेजारी बसलो होतो आणि त्याच्या हालचाली पाहिल्या होत्या, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपास अधिकाऱ्यांनी आपली कधीच चौकशी केली नाही, असा खुलासाही ख्वाजाने केला आहे.
मूळ चौकशीत केवळ स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांनाच या योजनेची माहिती असल्याचा निष्कर्ष काढत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लियॉन यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे आपल्याला या गैरप्रकाराची माहिती नसल्याचे स्पष्ट केले होते. आता ख्वाजाच्या दाव्यांना वॉर्नरने जाहीर पाठिंबा दिला असला, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी पुन्हा चौकशी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मंडळ आपल्या मूळ निष्कर्षांवर समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी ‘टुडे एफएम’वरील (2DayFM) ‘ब्रेकफास्ट विथ नॅथ अँड एम्मा’ या कार्यक्रमात बोलताना क्लार्कने सत्य बाहेर आणण्यासाठी नव्या चौकशीची गरज बोलून दाखवली. तो म्हणाला, “आपण अद्याप पुढे गेलेलो नाही आणि ऑस्ट्रेलियन चाहतेही हे प्रकरण विसरलेले नाहीत. सत्य काय आहे हे त्यांना माहीत नाही. जोपर्यंत या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जात नाही आणि सत्य समोर येत नाही, तोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही.”
क्लार्कने पुढे नमूद केले, “२०१८ मध्ये सत्य समोर आणण्याची संधी होती, पण तसे झाले नाही. २०२१ मध्ये जेव्हा बॅनक्रॉफ्टने ‘द गार्डियन’ला मुलाखत दिली, तेव्हाही सत्य लपून राहिले. आता पुन्हा एक संधी चालून आली आहे. या प्रकरणात अडकलेल्या सर्वांनी सत्य सांगावे आणि हे प्रकरण एकदाचे मिटवावे, अशी माझी इच्छा आहे.”
“सध्या माझ्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक आहेत. मला सर्वात आधी हे जाणून घ्यायचे आहे की, खरंच सर्वांना याची माहिती होती का? कारण काही खेळाडूंनी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे म्हटले होते. तसेच, हा प्रकार केवळ केपटाऊनमध्येच नाही, तर त्याआधीच्या सामन्यातही झाला होता का, हे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असेही क्लार्कने स्पष्ट केले.
२०१८ च्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणाचा भाग असलेल्या पॅट कमिन्सच्या मौनावरही क्लार्कने बोट ठेवले. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असूनही पॅट कमिन्सने अद्याप काहीच वक्तव्य केले नाही, यावर माझा विश्वास बसत नाही.”
क्लार्कच्या मते, सँडपेपर गेट प्रकरणामुळेच स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद गमवावे लागले, ज्यामुळे आधी टीम पेन आणि नंतर कमिन्सकडे नेतृत्व आले. “जर हे प्रकरण घडले नसते, तर आज स्मिथच कर्णधार असता आणि कमिन्सने एकाही सामन्यात नेतृत्व केले नसते. त्यामुळे या प्रकरणात कमिन्सने भूमिका मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे क्लार्कने शेवटी सुनावले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ निवडणूक: ‘सतेज पाटील, मुश्रीफांनी एकत्र निर्णय घेतला असता तर ४ संचालक पाठवले नसते’, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
- हॅमिल्टनमध्ये रोहित शर्मा १५ मिनिटांसाठी ‘बेपत्ता’; भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान मोठा गोंधळ
- आयपीएल इतिहासातील टॉप १० सर्वात मोठे ट्रेड आणि ट्रान्सफर; हार्दिक-अर्शदीप स्वॅप तिसऱ्या क्रमांकावर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








