प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीला संजय राऊत का आवडत नव्हते, याचा एक किस्सा सांगितला.
संजय राऊत यांच्यासोबतचे आपले संबंध अतिशय जुने असल्याचे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, दिलीप ठाकूर आणि संजय राऊत त्यांच्या वडिलांकडे तासन्तास बसायचे. या काळात राऊतांनी वडिलांच्या शिव्याही खाल्ल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पहिला संबंध आपल्या वडिलांशी आणि त्यानंतर बाळासाहेबांशी आल्याचे राज यांनी सांगितले.
१९८६ ते १९८८ च्या दरम्यान राज ठाकरे ‘मार्मिक’ आणि माधव गडकरी संपादक असलेल्या ‘लोकसत्ता’ला आपली व्यंगचित्रे देत असत. याच काळात संजय राऊत ‘लोकप्रभा’मध्ये गँगवॉरच्या कथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते. त्याच सुमारास ‘सामना’ सुरू झाला होता. त्यावेळी राऊत यांनी शिवसेनेच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते, ज्यामुळे बाळासाहेबांना ते आवडत नसत. असे असले तरी त्यावेळी दोघांची चांगली मैत्री होती. बाळासाहेबांच्या वर्तमानपत्राला अशी भाषा शोभते का, अशी चर्चाही त्यावेळी चालायची, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
काही काळाने संजय राऊत यांनी राज ठाकरेंना बाळासाहेब ‘लोकप्रभा’ला मुलाखत देतील का, अशी विचारणा केली. त्यावर राज यांनी ‘तुझी चांगली इमेज आहे’ असा मार्मिक टोला लगावला. या प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान राऊत यांनी काही वेडेवाकडे प्रश्न विचारल्याने बाळासाहेबांनी त्यांना चालू मुलाखतीमध्ये शिव्या हासडल्या. मात्र, राऊतांनी ती मुलाखत त्या शिव्यांसह तशीच प्रसिद्ध केली.
स्वतःला पडलेल्या शिव्या मुलाखतीत प्रसिद्ध करू शकणाऱ्या माणसाबाबत बाळासाहेबांची ‘बंदे मे दम है’ अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर १९९२ मध्ये राज ठाकरेंनी बाळासाहेबांना संजय राऊत चांगले लिहित असल्याचे सांगितले आणि विशेष म्हणजे त्याच वर्षी राऊत ‘सामना’चे संपादक झाले. बोधनकरांपासून सुरू झालेला हा प्रवास ‘बोध कीर्तन’पर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- लेखक-साहित्यिकांना अधूनमधून तुरुंगात पाठवलं पाहिजे: ‘बोध कीर्तन’च्या प्रकाशनात संजय राऊतांचे विधान
- इशान किशनच्या यष्टिरक्षणाच्या भूमिकेमुळे संजू सॅमसनच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
- भारत विरुद्ध न्यूझीलंड ५ वा टी-२०: ड्रीम ११ टीम, संभाव्य प्लेइंग ११ आणि पिच रिपोर्ट
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







