कोल्हापूर, 24 ऑक्टोबर: यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी कोल्हापुरात झालेली महत्त्वपूर्ण बैठक निष्फळ ठरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये ही चर्चा झाली. मात्र, दराबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्वाभिमानीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतली आहे.
या बैठकीला माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वजण जमल्यानंतर पालकमंत्र्यांसोबत ही बैठक पार पडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४,५०० रुपये मिळावी, या मागणीवर संघटना ठाम आहे. तसेच यंदा उसाला ५,००० रुपये आणि हंगाम संपताना ५०० रुपये मिळावेत, अशी स्वाभिमानीची प्रमुख मागणी आहे. यावर जिल्ह्यातील इतर कारखानदारांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका उपस्थित कारखानदारांनी मांडली.
आजची चर्चा प्राथमिक स्वरूपाची असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती पालकमंत्री आबिटकर यांनी दिली. साखरेचा हमीभाव २० नोव्हेंबरपर्यंत जाहीर होणे अपेक्षित असून, हमीभावाची लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. दिवाळीनंतर साखरेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कारखाने सुरू राहावेत, ही कारखानदारांपेक्षा सरकारची अधिक इच्छा आहे. मात्र, शेतकऱ्यांचा हेतू टंचाई निर्माण करण्याचा नसून साखरेला योग्य दर मिळणे हा आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
ऊस दराव्यतिरिक्त राजू शेट्टी यांनी नदीतील पाण्याच्या प्रश्नावरूनही सरकारवर गंभीर आरोप केले. नदी जाणीवपूर्वक कोरडी पाडण्याचा सरकारचा डाव असून, ऊस वाळून शेतकऱ्यांनी तो नाईलाजाने कारखान्यांना घालावा, अशी सरकारची मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या चार दिवसांत नदीत पाणी न सोडल्यास आम्ही स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडू, असा थेट इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना जरांगेंवर न बोलण्याच्या सूचना; महायुतीतील तणावानंतर हालचाली
- पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला येणार, ई-केवायसी नसल्यास अडकणार पैसे
- मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोचवले? ऑडिओ क्लिपच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Quick Answers
ही बैठक कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये पार पडली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४,५०० रुपये मिळावी, यंदा उसाला ५,००० रुपये मिळावेत आणि हंगाम संपताना ५०० रुपये मिळावेत, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
जोपर्यंत उसाचा दर जाहीर होत नाही, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
येत्या चार दिवसांत नदीत पाणी न सोडल्यास स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






