मुंबई, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा आरोप असणारी कथित ऑडिओ क्लिप उघड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त केला असून, हा प्रकार ‘लोकशाहीचा खून आणि बलात्कार’ असल्याचे म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी केवळ फॉरेन्सिक अहवालावर अवलंबून न राहता कारवाई करून आपली निष्पक्षता महाराष्ट्राला दाखवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्री शिंदे गटाच्या (शिवसेना) एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या क्लिपची सायबर यंत्रणा आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेच्या माध्यमातून चौकशी करावी, तसेच भाजपनेही पक्षांतर्गत चौकशी करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. दरम्यान, ही क्लिप दोन वर्षांपूर्वीची असून ती आताच कशी बाहेर आली, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर आणि फॉरेन्सिक चौकशीच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या २९ मिनिटांच्या क्लिपचा उल्लेख त्यांनी ‘फ्रेंडशिप फाईल’ असा केला आहे. या क्लिपमध्ये भाजपचे काही पदाधिकारी, भाजपच्या सोशल मीडियात महत्त्वाची भूमिका बजावणारे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे मात्र भाजपच्या चिखलफेक सैन्यासाठी काम करणारे काही युट्युबर यांच्यातील ही मैत्रीची फाईल असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ५०० कोटी कोणी कोणाला दिले, माध्यमांवर कसा दबाव आणता येईल आणि सरकारच्या अंगाशी एखादा मुद्दा आल्यास नवीन धार्मिक ध्रुवीकरण करून लोकांचे लक्ष कसे भरकटवायचे, याची चर्चा या क्लिपमध्ये ऐकायला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
५०० कोटींच्या मुद्द्यावर खुलासे यायलाच हवेत, मात्र भाजपकडून समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर आणल्या जाणाऱ्या दडपशाहीवरही चर्चा होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. फॉरेन्सिक रिपोर्ट मागवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, फॉरेन्सिक अहवाल खून, बलात्कार आणि आर्थिक घोटाळ्यांसारख्या गुन्ह्यातील पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी असतो. मात्र, हे संभाषण ऐकले तर हा थेट ‘लोकशाहीचा खून आणि बलात्कार’ असल्याचे स्पष्ट होते.
क्लिपमधील संभाषण गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे, ही चांगली बाब असल्याचे सांगत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सावध केले. तुमच्या पाठीमागे काय काय सुरू होते हे तपासा आणि ही क्लिप कोणी व कशी बाहेर आणली, यातून सरकारमधील ‘शह-काटशहाचे’ राजकारण दिसत असल्याचे ते म्हणाले. फॉरेन्सिक आणि तांत्रिकतेच्या जाळ्यात महाराष्ट्राला गोल गोल न फिरवता, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून आपण किती निष्पक्ष आहोत हे दाखवून द्यावे; अन्यथा हा फॉरेन्सिक अहवाल स्वतःच्या फायद्यासाठी वाकवलेला ठरेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दुसरीकडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत, ते सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलणारे ‘डुप्लिकेट मराठा’ असल्याची टीका केली आहे आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे आयुष म्हात्रेवर शस्त्रक्रिया; मुंबईच्या देशांतर्गत हंगामातून बाहेर जाण्याची शक्यता
- मतपेटीचे छिद्र छोटे, ३८ उमेदवारांची मतपत्रिका कशी जाणार? सुधीर मुनगंटीवारांचा निवडणूक प्रक्रियेवर संताप
- मनोज जरांगे ‘डुप्लिकेट मराठा’, त्यांच्या तोंडाला काळं फासणार; एकनाथ शिंदे गटाचा इशारा
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा आरोप असणारी कथित ऑडिओ क्लिप उघड केली होती.
राज ठाकरे यांनी हा प्रकार 'लोकशाहीचा खून आणि बलात्कार' असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केवळ फॉरेन्सिक अहवालावर अवलंबून न राहता कारवाई करून आपली निष्पक्षता महाराष्ट्राला दाखवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी या २९ मिनिटांच्या क्लिपचा उल्लेख 'फ्रेंडशिप फाईल' असा केला. या क्लिपमध्ये ५०० कोटी कोणी कोणाला दिले, माध्यमांवर कसा दबाव आणायचा आणि नवीन धार्मिक ध्रुवीकरण करून लोकांचे लक्ष कसे भरकटवायचे याची चर्चा ऐकायला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने या क्लिपची सायबर यंत्रणा व फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत चौकशी करावी, तसेच भाजपने पक्षांतर्गत चौकशी करावी अशी मागणी केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








