Mumbai, 23 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि नवनियुक्त उपकर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याला उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे (ग्रेड ४ टीअर) शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. या दुखापतीमुळे हा १९ वर्षीय युवा खेळाडू सुमारे चार महिने मैदानापासून दूर राहणार असून, मुंबईच्या उर्वरित देशांतर्गत हंगामाला तो मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या (TOI) वृत्तानुसार, गुरुवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी म्हात्रेवर ९० मिनिटांची शस्त्रक्रिया केली. एका सूत्राने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, “वारंवार उद्भवणाऱ्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीवर (ग्रेड ४ टीअर रिपेअर) ही ९० मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या तो व्यवस्थित असून चालू शकत आहे आणि त्याला आज संध्याकाळी डिस्चार्ज दिला जाईल. मात्र, तो चार महिने क्रिकेटपासून दूर राहील.”
म्हात्रेवर उपचार करणारे डॉ. पारडीवाला हे प्रसिद्ध स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी यापूर्वी ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा या क्रिकेटपटूंसह नीरज चोप्रा, विनेश फोगट आणि पीव्ही सिंधू यांसारख्या ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंवरही उपचार केले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध सुरू असलेल्या २०२६-२७ च्या रणजी करंडक हंगामातील मुंबईच्या पहिल्याच सामन्यात म्हात्रेच्या जुन्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. तो ४८ धावांवर खेळत असताना धावा घेताना (रनिंग बिटवीन द विकेट्स) त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि त्याला सामन्यातून बाहेर पडावे लागले. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ४२९ धावा करत चंदीगडला दोनदा सर्वबाद केले आणि एक डाव व १५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
चार महिन्यांच्या विश्रांतीमुळे आता १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील त्याचा सहभागही जवळपास अशक्य झाला आहे. म्हात्रेसाठी २०२६ हे वर्ष सुरुवातीला अत्यंत आश्वासक ठरले होते. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करत विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर तो आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळला.
आयपीएलमध्ये १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धावा घेताना त्याला पहिल्यांदा डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद होऊनही त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६ डावांत १७७.८७ च्या स्ट्राईक रेटने दोन अर्धशतकांसह २०१ धावा फटकावल्या आणि तो सीएसकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
या सुरुवातीच्या दुखापतीमुळे म्हात्रे जूनमधील टी-२० मुंबई स्पर्धा, भारत अ संघाचा श्रीलंका दौरा आणि ऑगस्टमध्ये झालेली दुलीप करंडक स्पर्धा खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये जवळपास तीन महिने रिहॅबिलिटेशन प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे त्याच्या पुनरागमनाला विलंब झाला. अखेर रणजी करंडकातील त्याचे पुनरागमन आणखी एका गंभीर दुखापतीने संपुष्टात आले असून, त्याला पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीला सामोरे जावे लागणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताचे टी-२० मधील सर्वोच्च ५ यशस्वी रन-चेस: न्यूझीलंडविरुद्ध रचला विक्रम
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर संजू सॅमसनचे सोशल मीडियावरील टीकेबाबत मोठे विधान
- दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, दुसऱ्या कसोटीनंतर कशी आहे ‘WTC’ गुणतालिका?
Quick Answers
आयुष म्हात्रे याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीवर (ग्रेड ४ टीअर) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी म्हात्रेवर ९० मिनिटांची शस्त्रक्रिया केली.
या दुखापतीमुळे आयुष म्हात्रे सुमारे चार महिने मैदानापासून दूर राहणार असून, तो मुंबईच्या उर्वरित देशांतर्गत हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.
वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात तो ४८ धावांवर खेळत असताना धावा घेताना (रनिंग बिटवीन द विकेट्स) त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








