मुंबई, 11 ऑक्टोबर: दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित निदर्शनादरम्यान बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पोलिसांच्या गाडीतूनच त्याने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्याने दिलेल्या मिश्कील कॅप्शनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिनेता आमिर खानचा भाचा असलेला इम्रान पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला असताना त्याने (Imran Khan) हा फोटो पोस्ट केला. त्यात त्याने ‘बहुतेक मी फिरायला चाललो आहे’ असे लिहिले. या पोस्टमुळे सोशल मीडियावर युजर्स आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. यासोबतच पोलीस कर्मचारी त्याला वाहनात बसवून घेऊन जात असल्याचा एक कथित व्हिडीओही समोर आला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचे इम्रानने स्पष्ट केले. ‘माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी या शहरात राहणारा एक नागरिक म्हणून येथे आलो आहे. लोकांच्या मुक्तपणे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध का घातले जात आहेत आणि त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे,’ असे तो म्हणाला. आपण स्वतःच्या इच्छेने नागरिक म्हणून भूमिका मांडण्यासाठी सहभागी झाल्याचेही त्याने नमूद केले.
यापूर्वीही इम्रानने विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीमाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘पोलिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अश्रुधुराचा मारा करत होते आणि त्यांना मारहाण करत होते. या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, पण व्यवस्थेनेच त्यांची निराशा केली. त्यांना केवळ आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही,’ अशी भूमिका त्याने मांडली होती. तसेच व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्याने विचारले होते की, ‘ही भारतमातेची मुले नाहीत का? जर ही तिची मुले नसतील, तर आपण कोणासाठी विकास करतो आणि कोणाचे भविष्य सुरक्षित करण्याचा दावा करतो?’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) विरोध दर्शवण्यासाठी सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत निदर्शने झाली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दिल्लीत सुमारे १,००० तर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरातून ४०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इम्रानला ताब्यात घेतल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी सुटकेची मागणी करत स्थानिक पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्याचे वृत्त आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
- …म्हणून तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी नाना पाटेकरांना थेट कारगिल युद्धात पाठवले; थरारक किस्सा
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









