Share

राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, म्हणाले- ‘या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय!’

सीजेपीच्या आंदोलकांवरील कारवाईवरून राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला असून, मोदी-शाहांची हुकूमशाही उखडून काढण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

Raj Thackeray on Mumbai-Goa Highway delays

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करत, सत्तेच्या मस्तीतून आलेली ही बेबंदशाही उखडून काढली पाहिजे, अशी खरमरीत टीका त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

सीजेपीने शनिवारपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, हे आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, मेट्रो आणि बस सेवा थांबवण्यात आली, तसेच परिसरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली. काही आंदोलकांना विमानातूनही उचलून नेण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

शनिवारी सकाळी आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचलेले सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरव दास आणि ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईदरम्यान अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची पुढील धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवत असल्याचे स्पष्ट केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे आवाहन केले.

या सर्व घडामोडींवर संताप व्यक्त करताना राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना काढलेल्या, ‘कोणतेही राष्ट्र आपल्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर कृतज्ञ राहू शकत नाही’ या उद्गारांची आठवण करून दिली. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी अभिव्यक्ती पणाला लागता कामा नये. मात्र, मोदी आणि शाह यांच्या डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली असून, मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी त्यांनी सर्व यंत्रणा काबीज केल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ३ ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून, संपूर्ण निवडणूक यंत्रणा पारदर्शक असायला हवी, या मागणीत गैर काय? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यास मतचोरीचे करवते धनी कोण आहेत, हे उघड होईल आणि सत्तेचे बिंग फुटेल, याच भीतीपोटी त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) नुसार नागरिकांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार आंदोलकांना चिरडत आहे. एवढेच नाही तर, आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचाही छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयानेही या कारवाईवर ‘माशी मारायला हातोडा कशाला वापरताय?’ अशी विचारणा केल्याचे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रातील पोलीस संविधानाची काळजी घेत आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडतात, मात्र दिल्लीत महिला पत्रकारांनाही स्थानबद्ध करून त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले.

तरुणांनी यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला होता, त्याचा राग अद्याप शमलेला नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मोदी-शाहांनी गुजरातमध्ये सोयीची आंदोलने होऊ दिली, मात्र सत्तेत आल्यावर स्वतःच्या विरोधातील अनेक आंदोलने चिरडली, यावरून त्यांचा बेगडी आणि दुटप्पीपणा स्पष्ट होतो, अशी टीकाही त्यांनी केली. देशातील २०-३० वर्षांचे तरुण अस्वस्थ असून शांततेत आंदोलन करत आहेत, त्यांना चिरडून मोदी जगात लोकशाहीबद्दल कोणत्या तोंडाने बोलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अमित शाह बहुधा नेटफ्लिक्सवरील ‘हाऊ टू बिकम अ टिरंट’ (How to Become a Tyrant) ही जुलमी शासकावरील डॉक्युमेंट्री रोज गांभीर्याने बघत असावेत, असा टोला लगावत ठाकरे यांनी त्यांना महात्मा गांधींच्या शांततापूर्ण आंदोलनांचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. या देशाने मुघल, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचा माज उतरवला आहे, तिथे सत्ताधाऱ्यांचा माजही जनता उतरवेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी सरकारच्या परिपक्वतेची अपेक्षा व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही