राज्यात सध्या गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर डीजे बंदीच्या मागणीवरून राजकारण आणि समाजकारण चांगलंच तापलं आहे. पण याच गोंधळात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. कायद्याने आणि तांत्रिकदृष्ट्या डीजे किंवा डॉल्बीवर सरसकट बंदी आणताच येणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे डीजे बंदीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर संपूर्ण राज्यात यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. पण साताऱ्याचे एसपी निखिल पिंगळे यांनी याबाबतच्या लोकांच्या चुकीच्या संकल्पनाच खोडून काढल्या आहेत. डॉल्बी हे मुळात एक तंत्रज्ञान आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने या तंत्रज्ञानावर कधीच बंदी घातलेली नाही, असं पिंगळे यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, डीजे (डिस्को जॉकी) म्हणजे फक्त गाणी बदलणारा माणूस. त्यामुळे त्याच्यावरही बंदी कशी आणणार? थोडक्यात सांगायचं तर, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सरसकट बंदीसाठी नसून आवाजाची मर्यादा ओलांडू न देण्यासाठी आहेत.
Satara SP Nikhil Pingle speaking about DJ Dolby ban rules
डीजे बंदी आणि डॉल्बीचं तंत्रज्ञान: साताऱ्याच्या एसपींचं थेट आव्हान
सध्या स्पीकर पुरवणाऱ्या व्हेंडर्सनीही पळवाटा शोधल्या आहेत. बाजारात आता प्लाझ्मा आणि मिड प्रेशर बेस सिस्टीमसारखं नवीन तंत्रज्ञान आलंय. यात दिसतात फक्त दोन स्पीकर, पण त्यांचा दणदणाट दहा स्पीकरच्या बरोबरीचा असतो. पिंगळे यांनी इशारा दिलाय की, स्पीकर वगळता असं जादा आवाजाचं ऑगमेंटेड साहित्य आढळल्यास ते जप्त केलं जाईल. एवढंच नाही तर त्यांनी गणेश मंडळांना एक आव्हानही दिलं. जर तुम्हाला खरंच एवढ्या मोठ्या आवाजात स्पीकर लावायचे असतील, तर आधी मंडळाच्या अध्यक्षांच्या घरातील आजी-आजोबांना तिथे आणून बसवा, मग तुम्हाला आवाजाचा त्रास काय असतो ते समजेल, असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही कराडमध्ये बोलताना यालाच दुजोरा दिला. डॉल्बी किंवा डीजेवर पूर्ण बंदी नसून केवळ डेसिबलची मर्यादा पाळणं बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नियम मोडल्यास मात्र कारवाई अटळ आहे. माणसाच्या जीवाला धोका निर्माण होईल इतका आवाज खपवून घेतला जाणार नाही, हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शर्मा यांनी गणेश मंडळांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. उत्सवात भाविकांना वाटण्यात येणाऱ्या महाप्रसादासाठी आता अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी डोकेदुखी आता कमी झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांचा जीममधला घाम आणि ‘ती’ पोस्ट; राजकारणात पुन्हा कमबॅकची जोरदार तयारी?
- ‘गणपती विसर्जनाला नाचून कसला आनंद साजरा करताय?’, राज ठाकरेंचा डीजेला कडाडून विरोध
- पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी येणार का? नागरिकांच्या मोर्चानंतर पोलिसांचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











