पैठण | किरण काळे पाटील (ढाकेफळ)- शाळकरी मुलांच्या हातात पेन आणि पुस्तकांऐवजी तंबाखूच्या पुड्या दिसू लागल्याने हादरलेल्या बिडकीन पोलिसांनी (Bidkin Police) थेट गुटखा/तंबाखू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे.
अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी शाळांच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीरपणे सिगारेट आणि तंबाखू विकणाऱ्या १५ टपऱ्या आणि किराणा दुकानांवर धाडी टाकल्या आहेत. तत्पूर्वी, २६ ऑगस्टला गुटखा तस्करीचं एक मोठं आंतरजिल्हा रॅकेटही उद्ध्वस्त करण्यात आलं होतं.
या मोठ्या कारवाईनंतर अवघ्या २४ तासांतच बिडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने संपूर्ण हद्दीत धडक ‘सर्च ऑपरेशन’ राबवून शाळांच्या १०० मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अवैध धंदेवाईकांवर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
Bidkin Police Action on Tobacco and Gutkha Sellers Near Schools
बिडकीन पोलिसांच्या कारवाईत नेमकं काय घडलं?
सुरुवात झाली ती २६ ऑगस्टच्या मोठ्या कारवाईने. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चित्तेगावजवळील ज्ञानेश्वरनगर परिसरात एका पांढऱ्या स्कॉर्पिओतून (MH20EE2950) तब्बल ५ लाख ३९ हजार ६२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अस्लम हनीफ पठाण (वय ३५) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने बीड बायपास येथील सिराज सय्यद या मुख्य सूत्रधाराचं नाव उघड केलं.
या मोठ्या माशानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी आपला मोर्चा थेट शाळा आणि महाविद्यालयांबाहेर छुपी विक्री करणाऱ्यांकडे वळवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या आदेशानुसार, चित्तेगाव, लोहगाव, शेकटा, रांजणगाव आणि निलजगाव बीट अंमलदारांनी आपापल्या हद्दीतील शाळांच्या १०० मीटर परिसरात विशेष मोहीम राबवली. २७ ऑगस्टला एकाच दिवशी १५ कारवाया करत पोलिसांनी धडक गुन्हे दाखल केले.
शाळा परिसरातील १५ धाडींचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
| अ.क्र. | आरोपीचे नाव (वय) | कारवाईचे ठिकाण व शाळा परिसर | जप्त मुद्देमाल (किंमत) | कारवाई करणारे अधिकारी (फिर्यादी) |
| १ | कार्तिक बाबासाहेब निळ (२२) | भगवती विद्यालय जवळ, भारतनगर | सिगारेट, बिडी, तंबाखू (₹२८०) | पो.कॉ. हनुमान धनवे |
| २ | गणेश दिनकर देशमाने (४५) | भगवती विद्यालय जवळ, भारतनगर | सिगारेट, बिडी, तंबाखू (₹१४०) | पो.कॉ. हनुमान धनवे |
| ३ | विनायक भाऊसाहेब शिंदे (५०) | जि.प. शाळा, गाढेगाव पैठण फाटा | तंबाखू, बिडी, सिगारेट (₹५६०) | पो.हे.कॉ. अमोल मगर |
| ४ | नानासाहेब भाऊलाल ढोबळे (३८) | जि.प. प्राथमिक शाळा, रांजणगाव खुरी | बिडी व तंबाखू (₹१४०) | पो.हे.कॉ. संजीवन कदम |
| ५ | भिकचंद खंडुजी सुतार (४६) | छ. संभाजी विद्यालय, रांजणगाव खुरी | सिगारेट, तंबाखू (₹१८५) | पो.हे.कॉ. संजीवन कदम |
| ६ | अमोल अशोक शेळके (२७) | जि.प. शाळा, तोंडुळी | तंबाखू, बिडी (₹५१०) | पो.हे.कॉ. संदीप धनेधर |
| ७ | रहीम मीया शेख (४२) | महाराष्ट्र भूषण शाळा, बिडकीन | सिगारेट, तंबाखू, बिडी (₹२००) | पो.हे.कॉ. शिंमोन वाघमारे |
| ८ | अनिल नवललाल जैस्वाल (५५) | जि.प. शाळा, चितेगाव | सिगारेट, तंबाखू, बिडी (₹६८५) | पो.उप.नि. मनोज पाटील |
| ९ | कैलास देवराम नरवडे (५०) | ज्ञानांकुर विद्यालय, चितेगाव | सिगारेट, तंबाखू, बिडी (₹५२०) | पो.उप.नि. मनोज पाटील |
| १० | साईनाथ कडुबाळ गिधाने (४०) | ज्ञानांकुर विद्यालय, चितेगाव | सिगारेट, तंबाखू, बिडी (₹७००) | स.फौ. अशोक सोकटकर |
| ११ | जावेद अकबर पठाण (३२) | महाराष्ट्र भूषण शाळा, बिडकीन | सिगारेट, तंबाखू (₹१४०) | पो.हे.कॉ. शिंमोन वाघमारे |
| १२ | रफिक हैदर कुरेशी (६२) | पाडळी येथील शाळेजवळ | बिडी, तंबाखू (₹२,०००) | पो.उप.नि. मंजितसिंग सेना |
| १३ | विठ्ठल देविदास कुचीत (१९) | पाडळी येथील शाळेजवळ | बिडी, तंबाखू (₹२,०००) | पो.उप.नि. मंजितसिंग सेना |
| १४ | गौतम सुभाष खुरेकर (३२) | पोरगाव फाटा शाळेजवळ | सिगारेट, बिडी (₹८१५) | पो.उप.नि. मंजितसिंग सेना |
| १५ | सलमान वाहेद सय्यद (३२) | पोरगाव फाटा शाळेजवळ | तंबाखू, सिगारेट, बिडी (₹१,३५०) | पो.उप.नि. मंजितसिंग सेना |
दोन दिवसांतील कारवाईचा लेखाजोखा:
- २६ ऑगस्टची मोठी कारवाई: ₹५,३९,६२०/-
- २७ ऑगस्टची शाळा परिसरातील मोहीम: ₹१०,२२५/-
एकूण १६ गुन्हे आणि ₹५,४९,८४५/- चा मुद्देमाल जप्त.
पालकांनी या कारवाईनंतर सुटकेचा निःश्वास सोडला आहे. एका पालकाने उद्वेगाने सांगितलं, “आम्ही पोरांना शाळेत पाठवतो, पण शाळेबाहेर १०० पावलांवर जर ही व्यसनाची दुकानं थाटली असतील, तर आमच्या मुलांनी काय शिकायचं?” पोलिसांच्या या कारवाईमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पोलिसांची कारवाई कौतुकास्पद असली तरी…!
दुसरीकडे, गावात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांची कारवाई कौतुकास्पद असली तरी, “कारवाईला इतका उशीर का झाला?” असा सवाल नागरिक दबक्या आवाजात विचारत आहेत. वर्षानुवर्षे उघडपणे हा विषारी बाजार सुरू होता. प्रशासनाने इतके दिवस डोळे का मिटून घेतले होते? थोडक्यात सांगायचं तर, पोलिसांनी उगारलेला हा बडगा आता केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता, कायमस्वरूपी असावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राहील.
मुलांच्या कोवळ्या वयात व्यसनाची सवय लावणारे हे विक्रेते केवळ कायद्याचे गुन्हेगार नाहीत, तर एका पिढीचे मारेकरी आहेत. पोलिसांच्या या एका कारवाईने आशेचा किरण दिसला असला तरी, हा फास आता कायम आवळलेलाच राहायला हवा.
काय आहे ‘कोटपा’ (COTPA) कायदा?
१०० मीटरची लक्ष्मणरेषा: ‘कोटपा कायदा २००३’ नुसार कोणत्याही शाळा किंवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, गुटखा आणि तंबाखू विकण्यास सक्त मनाई आहे.
थेट फौजदारी कारवाई: या कायद्याच्या कलम ६(ब) आणि २४ नुसार नियम मोडल्यास, पोलिसांना थेट मुद्देमाल जप्त करून दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पूर्ण अधिकार आहेत.
उद्देश: कोवळ्या शाळकरी मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखणे आणि शाळा परिसर सुरक्षित ठेवणे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्रासाठी समितीला मुदतवाढ
- ‘शिंदे गट म्हणजे कोब्रा गँग’; महापौरपदाच्या फॉर्म्युल्यावर संजय राऊतांचा घणाघात
- जरांगेंचा इशारा खरा ठरला? पुरावे असूनही ‘कुणबी’ रद्द; विद्यार्थिनीचे शिक्षण संकटात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











