Tukaram Mundhe: घरबसल्या अवघ्या १० मिनिटांत ग्रोसरी मागवताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही मागवत असलेले खाद्यपदार्थ खरोखरच सुरक्षित आहेत का? असा अत्यंत गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय.
सध्या ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा ट्रेंड खूप वाढलाय. पण या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधील अस्वच्छतेचा आता मोठा गौप्यस्फोट झालाय. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट मैदानात उतरून धडक कारवाई केली. त्यामुळे ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्ट सारख्या बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढेंचा दणका; डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात तब्बल ८६ ठिकाणी एफडीएने छापे टाकले. त्यात ६० आस्थापनांना थेट सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तर १२ डार्क स्टोअर्सचे परवाने थेट निलंबित केले गेलेत. यात ब्लिंकिटचे ५, झेप्टोचे ५ आणि इन्स्टामार्टच्या २ स्टोअर्सचा समावेश आहे. एकट्या मुंबईतच २४ ठिकाणी तपासणी झाली असून १० जणांचे परवाने रद्द झालेत.
तपासणीत जे समोर आलं, ते खरंच संतापजनक आहे. मालाडच्या ब्लिंकिट स्टोअरमध्ये चिलरचं तापमान मर्यादेबाहेर होतं. गंजलेले रॅक्स आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थ चक्क एकत्र ठेवलेले होते. तिथल्या तब्बल ४० कामगारांची वैद्यकीय तपासणीही झालेली नव्हती. दुसरीकडे, घाटकोपरमधील ब्लिंकिटला तपासणीत केवळ ४६ टक्के गुण मिळाले. तिथे ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला होता.
अंधेरी लोखंडवाला येथील झेप्टोच्या स्टोअरमध्ये चक्क खाद्यपदार्थ आणि केमिकल्स एकत्र सापडले. मुलुंडमध्येही कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले होते. तर इन्स्टामार्टच्या अंधेरीतील डार्क स्टोअरमध्ये अन्नपदार्थ थेट जमिनीवरच टाकलेले आढळले.
या भोंगळ कारभारामुळे एफडीएने आता अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत. ज्यांचे परवाने निलंबित झालेत, त्यांची खरेदी-विक्री आणि डिलिव्हरी पूर्णपणे बंद करण्यात आलीय. स्वच्छता, पेस्ट कंट्रोल आणि ‘फर्स्ट इन, फर्स्ट आउट’ (FIFO) नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक निर्देश मुंढेंनी दिलेत. थोडक्यात सांगायचं तर, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता चांगलीच चपराक बसली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे
- परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा
- AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











