Share

आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; तब्बल २५० अवैध गर्भपात करणारा माजी सिव्हिल सर्जन रंगेहाथ अटकेत

कोल्हापुरात एका माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याने तब्बल २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

Published On: 

Kolhapur Illegal Abortion - Arrested Doctor Chandrakant Gaikwad at Pratima Hospital

कोल्हापुर– एका डॉक्टरचं काम काय असतं? जीव वाचवणं. पण तोच डॉक्टर जेव्हा पैसे घेऊन गर्भातल्या कळ्या खुडायला लागतो तेव्हा काय म्हणायचं? कोल्हापुरात नुकताच असाच एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आलाय.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कदमवाडी रोडवरील ‘प्रतिमा हॉस्पिटल’चे संचालक डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलंय. तेही बेकायदेशीर गर्भपात करताना. धक्कादायक बाब म्हणजे, हे महाशय साधेसुधे डॉक्टर नसून चक्क माजी सिव्हिल सर्जन आहेत.

Kolhapur Illegal Abortion: हायप्रोफाईल डॉक्टर ते गर्भपात रॅकेटचा सूत्रधार

डॉ. गायकवाड यांचं प्रोफाइल तसं भलंमोठं आहे. त्यांनी पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बीड अशा अनेक ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पुण्यात सहाय्यक संचालक, तर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ते अतिरिक्त अधीक्षक होते. अशा हायप्रोफाईल डॉक्टरने हा काळा धंदा उघडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताची औषधं जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी जो आकडा सांगितला, तो ऐकून पोलीसही हादरले. आतापर्यंत तब्बल २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची त्यांनी पोलिसांना स्पष्ट कबुली दिलीय.

या सगळ्यात अटकेची कारवाई सुरू असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात (CPR) दाखल करावं लागलं. सध्या पोलीस त्यांना न्यायालयासमोर हजर करून कोठडी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

या रॅकेटचा सुगावा कसा लागला?

काही दिवसांपूर्वी कळंब्याच्या एका लॉजवरून स्वप्नील पाटील नावाच्या बोगस डॉक्टरला अटक झाली होती. त्याची साथीदार अश्विनी शिंदेनं पोलीस कोठडीत तोंड उघडलं. जिच्या पोटात मुलगी असल्याचं निष्पन्न व्हायचं, तिला गर्भपातासाठी थेट डॉ. गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवलं जायचं, असा मोठा गौप्यस्फोट तिनं केला.

मिळालेली माहिती पक्की करण्यासाठी पोलिसांनी मग एक सापळा रचला. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि डॉ. मदने यांच्या पथकाने एक डमी पेशंट हॉस्पिटलमध्ये पाठवली. डॉ. गायकवाड यांनी ना कसला केसपेपर काढला ना अधिकृत नोंद केली. थेट पोर्टेबल मशीनवरून तपासणी केली. आणि गोळ्या देऊन गर्भपात करायची तयारी दाखवली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकत त्यांना रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही