🕒 1 min read
नाशिक– “कामात कुचराई केली तर खबरदार…” असा दम भरणारे नेते तसे दुर्मिळच. पण राज ठाकरेंचा स्वभावच असा आहे की ते कामाच्या बाबतीत कोणाचीही गय करत नाहीत. नाशिकच्या सभेत त्यांनी असाच एक जुना आणि थरारक किस्सा सांगून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. “रस्त्यात खड्डा पडला, तर तुलाच त्याच खड्ड्यात उभा करून मारेन,” अशी सणसणीत धमकी राज ठाकरेंनी नेमकी कुणाला दिली होती? हा किस्सा ऐकून सभेत एकच हंशा पिकला.
Raj Thackeray Speech Nashik
नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनसेच्या काळात नाशिकमध्ये रस्ते उत्तम का होते? याचं गुपित सांगताना ते म्हणाले की, मी त्यावेळी कंत्राटदारांची खास बैठक बोलावली होती. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, “हे तुमचं बजेट घ्या. पैसे कोणी मागितले तर मला सांगा. पण बजेट घेऊनही जर रस्ते चांगले झाले नाहीत आणि रस्त्यात खड्डा पडला, तर त्याच खड्ड्यात तुम्हाला उभा करून मारेन.” या धाकामुळेच ५ वर्षात पत्रकारांना खड्ड्यांचे फोटो काढायला मिळाले नाहीत, असं राज (Raj Thackeray) यांनी छातीठोकपणे सांगितलं.
जिथे आजच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तिथे राज यांनी अभिमानाने सांगितलं की, “आमच्या ५ वर्षांच्या काळात महापालिकेवर विरोधी पक्षानेही भ्रष्टाचाराचा एकही आरोप केला नाही. उलट ७०० कोटींचं कर्ज असलेल्या पालिकेला आम्ही कर्जमुक्त केलं.” बोटॅनिकल गार्डन असो, जीपीएस लावलेल्या घंटागाड्या असो किंवा धरणातून थेट पाईपलाईन; नाशिकचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा त्यांनी केला. “पण गेल्या ५ वर्षात या शहराची वाट लावली,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
नाशिककरांसाठी राज यांनी एक भावनिक सादही घातली. “आनंद महिंद्रा, टाटा, अंबानी अशा बड्या उद्योगपतींना मी नाशिकमध्ये आणलं, प्रकल्प उभे केले, पण बदल्यात काय मिळालं? पराभव!” अशा शब्दांत राज यांनी आपली वेदना मांडली. शहराचं सध्याचं बकालपण घालवायचं असेल आणि “तुमच्या चिल्ल्यापिल्यांचं भविष्य सुधारायचं असेल,” तर पुन्हा एकदा शिवसेना-मनसेच्या हाती सत्ता द्या, असं आवाहन करायला ते (Raj Thackeray) विसरले नाहीत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “टांगा पलटी, घोडे फरार..!”; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना ‘अल्टिमेटम’; नवी मुंबईत महायुतीतच ‘महायुद्ध’!
- पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












