मुंबई– राजकारणात शब्दांचा बाण सुटला की तो किती खोलवर घाव घालतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात आलाय. “मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही,” असं म्हणणाऱ्या भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांची उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) “हा कोण चाटम?” अशी खिल्ली उडवली. ठाकरेंचा हा वार साटमांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, त्यांनी आता ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. मी सामान्य कुटुंबातून आलोय, कोणाच्या आशीर्वादाने नाही,” असा संताप साटम यांनी व्यक्त केलाय.
Amit Satam vs Uddhav Thackeray
शिवसेना भवनात आज ठाकरे बंधूंनी ‘वचननामा’ प्रसिद्ध केला. त्यानंतर अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत थेट उद्धव ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवलं. “तुमचा महापौर झाला तर महाराष्ट्राचा पाकिस्तान होईल,” असं अतिशय वादग्रस्त विधान साटम यांनी केलं.
साटम यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं. “२५ वर्षांत ‘उद्धव मामु’नी मराठी माणसासाठी केलेलं एक तरी काम दाखवावं. आम्ही १० कामं दाखवतो. आम्ही बीडीडी चाळीत घरं दिली, तुम्ही फक्त मातोश्री २ बनवलं,” असा घणाघात त्यांनी केला. तसंच, राज ठाकरेंचे कार्यकर्ते मारामारी करून संस्कृती बिघडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनीही भाजपला सडेतोड उत्तर दिलंय. ९२ हजार कोटींच्या एफडीवरून (FD) सुरू असलेल्या वादावर बोलताना ठाकरे कडाडले, “मुख्यमंत्र्यांचं ‘ठेवी चाटायला नसतात’ हे विधान अशोभनीय आहे. ठेवी या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात.” पालिकेत सध्या खोकासुरांनी ३ लाख कोटींचा घोटाळा करून ठेवल्याचा गंभीर आरोपही ठाकरेंनी केला.
मराठी माणसाच्या मुद्द्यावरून पेटलेला हा वाद आता ‘चाटम’ विरुद्ध ‘मातोश्री २’ आणि ‘अदानींच्या घशात मुंबई’ अशा टोकाच्या आरोपांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मुंबईकर कोणाच्या पारड्यात माप टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजितदादा अन् साहेब पुन्हा एकत्र येणार? निलेश लंकेंनी फोडला बॉम्ब; म्हणाले, “दोघांनाही आनंदच होईल!”
- राज-उद्धव एकत्र आले तरी ‘फायदा’ नाही? फडणवीसांनी मांडली भाजपची ‘ती’ थिअरी, म्हणाले “तुमचा इंटरेस्ट तर…”
- “मुरली अण्णा, स्वतःच्या गिरेबानात पाहा…”; रुपाली ठोंबरेंनी भाजपचं वस्त्रहरण केलं, म्हणाल्या “तुमची नीती वापरा आणि…!”













