मुंबई, 19 ऑक्टोबर: रविवारी रात्री मुंबईतील जुहू परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या बीएमडब्ल्यू कारवर झालेल्या अंधाधुंद गोळीबार प्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तुर्किये देशातील ‘जिगाना’ (Zigana) या विदेशी पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी राजस्थानच्या कोटा येथून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफ गाडीत बसताच हल्लेखोरांनी जवळून गोळीबार सुरू केला. त्यांनी ७.६२ एमएम काडतुसांचे एकूण सात राऊंड फायर केले. घटनास्थळावरून पाच रिकाम्या पुंगळ्या आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गोळीबार करत असताना एका हल्लेखोराचे पिस्तूल अचानक लॉक झाल्यामुळे त्यातील जिवंत काडतुसे खाली पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. पिस्तूल लॉक झाल्यामुळेच टायगरला बचावाची संधी मिळाली आणि तो थोडक्यात बचावला. मात्र, या हल्ल्यात कारचालकासह दोन जण जखमी झाले आहेत. संशयित विदेशी पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नसून, मुंबई गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
हल्लेखोरांनी घटनेपूर्वी या परिसराची रेकी केली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा पार्कजवळ ते सुमारे ४५ मिनिटे टायगरची वाट पाहत थांबले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन जण एका दुचाकीवरून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील एक जण दुचाकी सुरू ठेवून उभा होता, तर इतर दोघांनी खाली उतरून टायगरच्या कारवर गोळीबार केला. घटनेनंतर आधीच तयार असलेल्या दुचाकीवरून हे तिघेही पसार झाले.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या टीपच्या आधारे राजस्थानच्या कोटा पोलिसांनी १५ मिनिटांत कारवाई करत रेहान ऊर्फ सुक्का, हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. हे तिघेही पुणे-जयपूर सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. कोटा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, घटनेपूर्वी अनिल पंडित याने रेहानशी संपर्क साधला होता. त्यानंतर रेहानने अल्पवयीन तरुणाला सोबत घेतले. मुंबईतील रहिवासी असलेल्या हृतिकला घटनास्थळाची पूर्ण माहिती होती. पैशांसाठी हा गोळीबार करण्यात आला असून, टायगरचा जीव घेण्याचा नव्हे, तर त्याला केवळ घाबरवण्याचा यामागे उद्देश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ७ दिग्गज: टायगर श्रॉफ, सलमान खानसह कोणावर, कधी झाले हल्ले?
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
- गोकुळ दूध संघ निवडणूक: हसन मुश्रीफांच्या मुलासह शौमिका महाडिक पराभूत, सतेज पाटलांची बाजी
Quick Answers
टायगर श्रॉफच्या कारवरील हल्ल्यात तुर्किये देशातील 'जिगाना' (Zigana) या विदेशी पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी रेहान ऊर्फ सुक्का, हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार पैशांसाठी करण्यात आला होता आणि टायगरचा जीव घेण्याचा नव्हे, तर त्याला केवळ घाबरवण्याचा यामागे उद्देश होता.
गोळीबार करत असताना एका हल्लेखोराचे पिस्तूल अचानक लॉक झाले, ज्यामुळे टायगरला बचावाची संधी मिळाली आणि तो थोडक्यात बचावला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







