🕒 1 min read
माळेगाव– “यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं पालन करा,” असा स्पष्ट इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ‘बळीराजा सहकार बचाव’ पॅनेलच्या सभेत त्या बोलत होत्या. सुळे यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
“चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण मांडलं. ते म्हणायचे, ‘तुम्हीही सत्तेत राहा.’ पण आज तसे होताना दिसत नाही. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. मात्र, यशवंतराव चव्हाण यांचं केवळ नाव वापरणं पुरेसं नाही. त्यांचे विचार आत्मसात करावेत. याचा आत्मचिंतन करा,” अशा शब्दांत सुळे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
Supriya Sule targets Ajit Pawar
पीडीसीसी बँकेबाबत सुद्धा सुळे यांनी जोरदार प्रश्न उपस्थित केले. “इतकी चांगली बँक रात्री ११ वाजता उघडी का? सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? ही बँक कुणाची मक्तेदारी नाही. नियम तुम्हीच बनवायचे आणि मोडायचे, याला लोकशाही नाही तर दडपशाही म्हणतात,” असा घणाघात त्यांनी केला.
“माळेगावच्या सभासदांची नावं तिथं का आहेत? माझंही नाव असेल. पारदर्शक चौकशी हवी. एसआयटी कमिटी नेमावी. मोदी पारदर्शक व्यवहाराच्या गप्पा मारतात, मग पीडीसीसी बँकेवरच प्रश्न का निर्माण होतो?” असा सवाल करत सुळे ( Supriya Sule ) यांनी चौकशीची मागणी केली.
सुळे यांनी स्थानिक समस्यांकडेही लक्ष वेधलं. “बारामतीत फळविक्रेत्यांच्या टोपल्या फेकल्या जातात. नगरपालिकेला असा अधिकार कोणी दिला? गरीबांचे माल फेकायचे आणि श्रीमंतांना सवलती द्यायच्या हे चालणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. “लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढा. गरीब माणसाशी लढून काय मिळणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुळे म्हणाल्या, “आजपासून रात्र वैऱ्याची आहे. दरवाजा वाजेल, लोक येतील, व्हिडिओ चालू ठेवा. काहीही घडलं, तर ते टिपा. ही झोपायची वेळ नाही, ही लढ्याची वेळ आहे. समता शिक्षणातूनच मिळते. बळीराजा सहकार बचाव पॅनलला संधी द्या,” अशी विनंतीही त्यांनी उपस्थितांना केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पहिल्याच कसोटीत फटकेबाजी! यशस्वी जैस्वालने इंग्लंडमध्ये केला इतिहास
- जयपूरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील जोडप्याचा रोमान्स सार्वजनिक; व्हिडीओ व्हायरल
- “…म्हणून मी ट्रम्प यांचं अमेरिका भेटीच निमंत्रण नाकारलं”, नरेंद्र मोदींनी सांगितलं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












