मुंबई, 17 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या आगामी ‘सूर्या: अंत से आरंभ तक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अडचणी वाढल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राजस्थान युनिटने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाने केंद्र सरकार, सेन्सॉर बोर्ड (CBFC) आणि चित्रपटाशी संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या सर्व पक्षकारांकडून तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.
या चित्रपटातून मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा गंभीर आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सदर याचिकेला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
चित्रपट न पाहताच त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचा युक्तिवाद केंद्राने न्यायालयात केला. तसेच, तज्ज्ञांच्या स्क्रीनिंग कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. आता या प्रकरणावर २० नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
या कायदेशीर कचाट्यामुळे २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या एका रिपोर्टनुसार, या वादामुळे चित्रपट आता थेट १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित केला जाऊ शकतो. मात्र, प्रदर्शनाची तारीख बदलल्याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निवेदन दिलेले नाही.
‘सूर्या’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोसेफ’ या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांनीच या नव्या रिमेकचेही दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सनी देओलच्या साथीला रवी किशन, प्रज्ञा जयस्वाल, मनीष वाधवा आणि टिन्नू आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाव्यतिरिक्त सनी देओलकडे आगामी काळात आणखी काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो बहुचर्चित ‘रामायण पार्ट २’ या चित्रपटात भगवान हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच त्याचा ‘गबरू’ हा नवा चित्रपटही लवकरच येणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंड कसोटी मालिकेतून कुलदीप यादवला वगळले, गुरनूर ब्रारची संघात एन्ट्री
- पाकिस्तानच्या शिवीगाळीला मैदानातूनच दिलं उत्तर! यशवीर गौडचा U19 आशिया चषकातील आक्रमक सेलिब्रेशनवर मोठा खुलासा
- “आम्हाला त्याची चिंता नाही”: उस्मान ख्वाजाच्या सँडपेपर गेट खुलाशावर कागिसो रबाडाची प्रतिक्रिया








