🕒 1 min read
मनोरंजन विश्वात एखाद्या कलाकाराला डोक्यावर घ्यायचं की थेट ट्रोलिंगच्या दरीत ढकलायचं, हे आजकाल सोशल मीडिया ठरवू लागलाय. पण जेव्हा समोर सचिन पिळगावकर यांच्यासारखा अष्टपैलू आणि अनुभवी कलाकार असतो, तेव्हा ट्रोलिंगचे वारही फुसके ठरतात. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रोल होणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी आता या सगळ्यावर मौन सोडलं असून, त्यांनी दिलेले उत्तर ऐकून ट्रोलर्सनाही आता विचार करावा लागणार आहे.
“ट्रॉलर्समुळे मला आज नवनवीन जाहिराती मिळत आहेत,” असं धक्कादायक पण सकारात्मक विधान सचिन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या शोच्या निमित्ताने ‘रेडिओ सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत ते मनमोकळेपणाने बोलले. ट्रोलिंगमुळे त्रास होण्याऐवजी त्याचा आपल्या करिअरला कसा फायदा होतोय, हे सांगताना सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सची चांगलीच फिरकी घेतली.
Sachin Pilgaonkar Interview
सचिन म्हणाले की, करिअरच्या ६५ व्या वर्षी जर मी ट्रोलर्ससाठी इतका महत्त्वाचा वाटत असेल, तर हे माझ्यासाठी मोठं यश आहे. आज सोशल मीडियावर मी इतका चर्चेत आहे की, कंपन्या मला जाहिरातींसाठी विचारत आहेत. याकडे मी एका वेगळ्या नजरेने पाहतोय. “आमच्या कामावर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाच नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली.
यावेळी त्यांनी शाहरुख खानचा एक किस्सा सांगितला. शाहरुख म्हणाला होता की, जर मला ट्रोल करून कोणाला रात्री शांत झोप लागत असेल, तर मला त्याचा आनंदच आहे. याच विचाराने सचिन पिळगावकर पुढे जाताना दिसतायत. ट्रोलिंग करणाऱ्या मुलांना त्यांनी चक्क आशीर्वाद दिले आहेत. “ही मुलं माझ्या नावाला जितकं महत्त्व देतायत, तितकंच स्वतःच्या नावाला देतील तेव्हा ती नक्कीच मोठी होतील,” असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सचे कानही टोचले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘पुढच्या पिढीचं काय होणार?’; लग्नाबद्दल बोलताना प्रियदर्शनीने मांडलं ‘भयाण’ वास्तव
- विदर्भाचं नशीब पालटणार? नागपुरात १५,००० कोटींचा प्रकल्प अन् सर्वात मोठी ‘ही’ योजना; ‘देवाभाऊं’ची मोठी घोषणा!
- मनोज वाजपेयीच्या सिनेमावर योगी आदित्यनाथ यांची करडी नजर; ‘त्या’ एका नावामुळे थेट FIR, लखनऊमध्ये खळबळ!













