पुणे– संसदेत एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक येतंय आणि त्यावरून शरद पवारांच्या पक्षातच दोन वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, ‘डिलिमिटेशन’ म्हणजेच ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’वरून आता जोरदार राजकारण तापलंय. एका बाजूला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर संसदेच्या पटलावर सकारात्मक चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. पण दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी मात्र या विधेयकाला कडाडून विरोध करत थेट बंडाची भाषा वापरली आहे.
‘सत्ताधाऱ्यांचा हा संविधानावर घाला घालण्याचा छुपा डाव’
रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत सत्ताधाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, या अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करून घेणं, हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य अजेंडा आहे. यासाठी राज्यांना ५० टक्के जागा वाढवून देण्याचं गोड आमिषही दाखवलं जाऊ शकतं. पण जर या आकड्यांच्या जाळ्यात अडकून विरोधकांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांचीही केवळ राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीये.
रोहित पवारांनी आसामचं उदाहरण देत म्हणाले की, भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही सगळी पुनर्रचना केली जाईल. सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी २०१६ पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची, याची रणनीती भाजपने आधीपासूनच आखल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय.
सध्या विरोधकांशी सलोख्याचं नाटक सुरू असून विधेयक मंजूर होताच हुकूमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल, असंही पवार म्हणाले. संविधानावर घाला घालण्यासाठी एकीकडे ‘डिलिमिटेशन’ आणि दुसरीकडे ‘SIR’ अशी जोरदार तयारी सुरू असून हा डाव आपण उधळून लावला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
Rohit Pawar on Delimitation Bill
शेवटी, ‘अपना टाईम आएगा’ म्हणत थांबण्याची आता वेळ उरलेली नाही, तर ‘अपना टाईम आ गया’ हा विश्वास बाळगून विरोधकांनी खंबीरपणे निर्णय घ्यावा, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंची समन्वयाची भूमिका आणि रोहित पवारांचा आक्रमक विरोध, यापैकी संसदेत शरद पवारांचा पक्ष नेमकी कोणती लाईन घेणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपचा DNA आता कारखानदारांचा, देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
- अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
- मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम













