प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने कास्टिंग काऊचबाबत मोठा खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असताना काही लोकांनी गैरवर्तन करत तिला बेडरूममध्ये ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा राखीने एका ताज्या मुलाखतीत केला आहे.
शार्दुलच्या पॉडकास्टमध्ये बोलताना राखीने तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील कटू अनुभव मांडले. शाहरुख खानसारख्या बड्या स्टार्सच्या तुलनेत ती आजही स्वतःला कमी का समजते आणि स्वतःच्या हक्कांसाठी का लढत नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की, तिच्या मनात लहानपणापासूनच एक प्रकारची भीती बसली आहे. जेव्हा ती नायिका आणि आयटम गर्ल बनण्याचे स्वप्न घेऊन इंडस्ट्रीत आली, तेव्हा लोक तिला थेट बेडरूम दाखवायचे किंवा जेवणासाठी बाहेर जाण्याची मागणी करायचे.
त्यावेळची राखी खूप निरागस आणि फारशी शिकलेली नसल्याने ती या प्रकारांना घाबरत असे. “लोकांनी माझ्यासोबत असे केले. मी तेव्हा घाबरलेली होते. पण आज जर कोणी माझ्यासोबत असे वागले, तर मी चप्पल काढून त्याला सणसणीत चपराक देईन,” असे ती स्पष्टपणे म्हणाली. मात्र, त्या काळातली ती दहशत आजही तिच्या मनात घर करून असल्याचे तिने मान्य केले.
या मुलाखतीत तिने आपली ठाम भूमिका मांडताना सांगितले की, “मी माझी कॉमेडी विकेन, स्वतःला विदूषक बनवून लोकांना हसवेन आणि त्यांचे मनोरंजन करेन. पण मी माझे शरीर कधीही विकणार नाही.” भारतीय माध्यमांनी तिला इतकी प्रसिद्धी दिली की, आज भारतात तिच्याकडे काहीही नसतानाही ती दुबईमध्ये ‘शेख’ असल्याचे राखीने शेवटी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- चिन्मय सुतारने रणजी करंडकात रचला इतिहास; भाऊसाहेब निंबाळकरांनंतर ४०० धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज
- राष्ट्रवादीच्या आंदोलनात शिवसेना आमदार संजय गायकवाड! स्वतःच्याच सरकारला दिला घरचा आहेर
- गृहराज्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून ५ हजारांची फसवणूक; खेडमध्ये एकावर गुन्हा दाखल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








