राजस्थान, 21 नोव्हेंबर: राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव करत निर्णायक विजय मिळवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ३७ जिल्ह्यांमधील ७,५४३ पंचायत समिती जागांपैकी ७,३९३ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी काँग्रेसने ३,७०१ जागांवर बाजी मारली आहे, तर भाजपला २,१८१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच, १,२७५ जिल्हा परिषद जागांपैकी ९८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यातही काँग्रेसने ५९९ जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि भाजपच्या वाट्याला ३०१ जागा आल्या आहेत.
या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरून मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंचायत निवडणुकांमध्ये दाखवलेला विश्वास आता आमची जबाबदारी आहे. भाजपच्या सरकार असलेल्या राज्यातून मिळालेला हा प्रतिसाद म्हणजे ‘डबल इंजिन’ सरकारला दिलेले थेट उत्तर आहे. भाजपने मनरेगावर हल्ला केला, शेतकऱ्यांना तोट्यात ढकलले आणि पंचायतींचे अधिकार काढून घेतले. महागाई, बेरोजगारी व स्थलांतरामुळे गावे ओस पडली. गावे हे सर्व पाहत होती आणि सहन करत होती, आता त्यांनी आपला आवाज उठवला आहे. हा केवळ राजस्थानचा कौल नसून, देशातील प्रत्येक गावाचा आवाज आहे.
तर, राजस्थान प्रदेश काँग्रेसनेही निवडणूक निकालांवर भाष्य केले आहे. जनतेने स्पष्ट बहुमतासह काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून दिल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजपच्या भ्रष्टाचार आणि अराजकतेला कंटाळलेल्या जनतेच्या संतापाचा हा जिवंत पुरावा असून, विजयाची ही लाट आता वादळात रूपांतरित होईल आणि भाजपच्या हुकूमशाही व लोकविरोधी सरकारला हद्दपार करेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला.
या निकालांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत जयपूरमध्ये म्हणाले, “सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असताना जनतेने त्यांना दिलेली ही ‘भेट’ आहे. त्यांच्या दारुण पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा गैरकारभार. जनता त्रस्त होती, कामे होत नव्हती, भ्रष्टाचार वाढला होता आणि लोकांच्या तक्रारी ऐकणारे कोणीही नव्हते. त्यामुळे लोकांचा राग वाढत गेला. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या काँग्रेसच्या धोरणे, कार्यक्रम आणि तत्त्वांसाठी झटत आहोत, त्याचीच पोचपावती म्हणजे आमचा हा विजय आहे.”
राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली असून ३७ पैकी २४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेत त्यांचे संख्याबळ भाजपहून अधिक आहे. पंचायत समितीत जयपूरमध्ये काँग्रेसने २१६ तर भाजपने ८७ जागा जिंकल्या. जोधपूरमध्ये काँग्रेसला १९५ आणि भाजपला ८१ जागा मिळाल्या. यासोबतच भिलवाडा (काँग्रेस १६५, भाजप १११), बिकानेर (काँग्रेस १५५, भाजप ६५), दौसा (काँग्रेस १३५, भाजप ५९) आणि सीकरमध्ये (काँग्रेस १७९, भाजप ८७) काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. पश्चिम राजस्थानमधील बाडमेर (१२० विरुद्ध ६२), जैसलमेर (८९ विरुद्ध ३६) आणि राजसमंदमध्येही (९७ विरुद्ध ५८) काँग्रेसने भाजपला मागे टाकले.
दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने अजमेर, ब्यावर, डुंगरपूर, झालावाड, पाली आणि उदयपूर या ६ जिल्ह्यांत आघाडी मिळवली आहे. पंचायत समितीच्या लढतीत अजमेर (८३ विरुद्ध ८०), बालोतरा (६३ विरुद्ध ५७), सलूंबर (३८ विरुद्ध ३२) आणि उदयपूरमध्ये (१४६ विरुद्ध १३७) भाजपने काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नीट पेपरफुटी प्रकरणात आज १४ आरोपींवर निश्चित होणार आरोप; राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी
- पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
- शुबमन गिलच्या वादग्रस्त LBW निर्णयावरून न्यूझीलंडचे खेळाडू नाराज, ऋषभ पंतने दिले सडेतोड उत्तर








