🕒 1 min read
पुण्याची संस्कृती म्हणून ज्या शांततेचं उदाहरण दिलं जायचं, तिला आता गालबोट लागतंय की काय? असा प्रश्न पडलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत विचारांची लढाई होण्याऐवजी आता दगड-गोट्यांची भाषा सुरू झाली आहे, याचा धक्कादायक प्रत्यय पुण्यात आला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बड्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे महानगरपालिका निवडणुकीचं (PMC Election 2026) वारं सध्या जोरात आहे. अशातच हडपसर सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात प्रचाराने हिंसक वळण घेतलं. शिवसेनेचे (शिंदे गट) पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) हे आपल्या ताफ्यासह प्रचारासाठी काळेपडळ परिसरात फिरत होते. बुधवारी (ता. 7) रात्री 8 च्या सुमारास मयूर जेएमएनएस सोसायटीजवळ अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.
या भ्याड हल्ल्यात नाना भानगिरे यांच्या गाडीच्या काचांचा चुराडा झाला. या दगडफेकीत प्रभाग क्रमांक 41 च्या महिला उमेदवार सारिका पवार यांनाही दुखापत झाली आहे. एका दगडामुळे त्यांच्या हाताला इजा झाल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर काळेपडळ परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण होते. “हा हल्ला अत्यंत भ्याड असून, लोकशाहीत अशा कृत्यांना जागा नाही,” अशा शब्दांत नाना भानगिरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून, लवकरच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील. भर प्रचारात झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मात्र चिंतेचे वातावरण आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांनी मुलाला पाडलं, त्यांच्याशीच मैत्री?’; शेलारांनी राज ठाकरेंच्या थेट वर्मावरच बोट ठेवलं!
- प्रचाराचा ‘धूर’ निघाला! फटाक्यांमुळे इमारतीला आग; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “हे मूर्ख लोक…”
- वर्षा उसगांवकरांनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ खाजगी किस्सा; आईसमोरच म्हणाले, “मी बिअर पितो पण…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












