मुंबई, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोप आणि ऑडिओ क्लिपच्या वादानंतर महायुतीतच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचे फोटो दाखवून आणि प्रवीण दरेकर यांचे नाव घेत व्हायरल क्लिप भाजपचीच असल्याचा गंभीर आरोप केला होता. याला उत्तर देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबाबत तुम्ही पाठीमागे काय बोलता, याच्या क्लिप्स आमच्याकडेही आहेत, असा थेट इशारा लाड (Prasad Lad) यांनी दिला आहे.
रामदास कदम यांनी फालतू धंदे बंद करावेत, आवाज वाढवून बोलल्यास आम्ही घाबरणार नाही, असे लाड यांनी सुनावले. संजय राऊत यांनी जशी शिवसेना बुडवली, तशीच रामदास कदम हे एकनाथ शिंदेंची शिवसेना बुडवायला निघाले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. कदम हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी माहिती घेऊन बोलायला हवे होते, पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी उप-मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला. जेव्हा जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, तेव्हा रामदास कदम कुठे होते? आम्ही त्यावेळी जरांगेंना अंगावर घेतले होते, याची आठवण लाड यांनी करून दिली.
जरांगे यांच्या गेटवेवरील आंदोलनाच्या वेळी शिंदे साहेबांचे स्वागताचे पोस्टर लागले होते, मग ते तुमचे होते असे आम्ही म्हणायचे का? असा सवाल लाड यांनी विचारला. तसेच, मगाशी रामदास भाई जी बाटली दाखवत होते, ती घेऊन ते झोपले होते, अशी खोचक टीका करत योग्य वेळ आल्यावर कदमांच्या क्लिप्स दाखवू, असे ते म्हणाले. कदम हे आपल्या मुलांसाठी अशी वक्तव्ये करतात, त्यामुळे योगेश आणि सिद्धेश कदम यांनीच आपल्या वडिलांना समजवावे, असा सल्ला लाड यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्यासोबत आपली आजही जवळीक असल्याचे स्पष्ट करत लाड म्हणाले की, मराठा सेवक म्हणून मी त्यांची अनेक कामे केली आहेत. त्यांना मदत लागल्यास आम्ही नक्की करू, पण त्यांनी उप-मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर आम्ही त्यांना विरोध केला. दरम्यान, जरांगे यांनी सुनावलेल्या ऑडिओ क्लिपबाबत चौकशी व्हावी, यासाठी आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला तपासाचे निर्देश दिले आहेत. सदर क्लिप खरी असेल तर कोणी काढली व पोहोचवली आणि खोटी असेल तर ती कशी तयार झाली, याचा तपास आता सायबर विभाग करणार असल्याची माहिती लाड यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘या तर पारावरच्या गप्पा!’
- एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदमांनीच घेतलीये का? ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांचा पलटवार
- ‘विराटने फोन, मेसेजला उत्तर दिले नाही’, पुनरागमनाची आशा संपवल्याचा अमित मिश्राचा कोहलीवर आरोप
Quick Answers
रामदास कदम यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचे फोटो दाखवून आणि प्रवीण दरेकर यांचे नाव घेत व्हायरल क्लिप भाजपचीच असल्याचा गंभीर आरोप केला होता.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबाबत तुम्ही पाठीमागे काय बोलता, याच्या क्लिप्स आमच्याकडेही असून योग्य वेळ आल्यावर त्या दाखवू, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
संजय राऊत यांनी जशी शिवसेना बुडवली, तसेच रामदास कदम हे एकनाथ शिंदेंची शिवसेना बुडवायला निघाले आहेत, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी टीका केली.
ऑडिओ क्लिपबाबत चौकशीसाठी निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला या प्रकरणाच्या तपासाचे निर्देश दिले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








