🕒 1 min read
मुंबई: महागाईच्या वाढत्या काळात आणि उतारवयातील खर्चाची चिंता सर्वांनाच सतावत असते. यावर मात करण्यासाठी अनेकजण विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यापैकीच एक लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF). निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. पण, अनेकांना पीपीएफ खाते कसे उघडावे, कोण पात्र आहे किंवा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याबाबत माहिती नसते. तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हीही तुमच्या निवृत्तीचे नियोजन चांगल्या प्रकारे करू शकाल.
पीपीएफ खाते उघडण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत, त्या खालीलप्रमाणे:
निवासस्थान: फक्त भारतीय नागरिकच पीपीएफ खाते उघडण्यास पात्र आहेत. अनिवासी भारतीय (NRI) नवीन खाते उघडू शकत नाहीत. मात्र, जर एखादी व्यक्ती भारतात खाते उघडल्यानंतर NRI झाली, तर त्यांना खाते परिपक्व होईपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवता येते.
वयोमर्यादा: १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती पीपीएफ खाते उघडू शकते. पालकांना अल्पवयीन मुलांच्या नावानेही खाते उघडण्याची मुभा आहे, पण प्रत्येक अल्पवयीन व्यक्तीसाठी फक्त एकच खाते उघडता येते. अल्पवयीन १८ वर्षांचे झाल्यावर खात्याचे नियंत्रण त्यांच्याकडे येते.
खात्यांची संख्या: एका व्यक्तीला स्वतःच्या नावावर फक्त एकच पीपीएफ खाते उघडता येते. पालकाने अल्पवयीन मुलासाठी खाते उघडल्यास, अनेक खाती उघडण्याची परवानगी मिळते.
हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF): HUF हे नवीन पीपीएफ खाते उघडण्यास पात्र नाहीत.
संयुक्त खाते: PPF खाते संयुक्तपणे (Joint Account) उघडता येत नाही. ते केवळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठीच आहे.
PPF खाते कसे उघडाल? संपूर्ण प्रक्रिया
पीपीएफ खाते उघडणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा काही विशिष्ट बँकांमध्ये हे खाते उघडू शकता. तुमच्या संबंधित बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
फॉर्म मिळवा: पीपीएफ खाते उघडण्यासाठीचा फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून घ्या. काही बँकांच्या अधिकृत वेबसाइटवर हा फॉर्म ऑनलाइनही उपलब्ध असतो.
अर्ज भरा: फॉर्ममधील सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा. सर्व रकाने योग्यरित्या भरले आहेत याची खात्री करून घ्या.
अर्जसोबत खालील कागदपत्रे सादर करा:
ओळखपत्राचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काहीही.
पत्त्याचा पुरावा: वीज बिल, फोन बिल, आधार कार्ड, पासपोर्ट.
पासपोर्ट आकाराचे फोटो.
पॅन कार्ड.
किमान रक्कम जमा करा: पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये जमा करून तुम्ही खाते उघडू शकता. कमाल वार्षिक गुंतवणूक मर्यादा १.५ लाख रुपये आहे.
स्टँडिंग इन्स्ट्रक्शन (पर्यायी): तुम्हाला जर नियमितपणे पीपीएफ खात्यात पैसे जमा करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या बचत खात्यातून आपोआप पैसे ट्रान्सफर होण्याची स्टँडिंग इन्स्ट्रक्शन लावू शकता.
नॉमिनेशन (पर्यायी पण महत्त्वाचे): तुमच्या पीपीएफ खात्यासाठी वारसदार (नॉमिनी) नियुक्त करणे फायद्याचे ठरते. हे खाते उघडताना किंवा नंतरही स्वतंत्र फॉर्मद्वारे करता येते.
निष्क्रिय (Inactive) PPF खाते पुन्हा कसे सक्रिय कराल?
लिखित विनंती: बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेला एक लेखी पत्र लिहा, ज्यामध्ये तुमचे पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय करण्याची विनंती करा.
थकबाकी जमा करा: प्रत्येक निष्क्रिय वर्षासाठी किमान ५०० रुपये भरा आणि सक्रिय वर्षासाठी प्रत्येकी ५० रुपये दंड भरा.
त्यानंतर, बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करून तुमचे खाते पुन्हा सक्रिय करेल.
PPF खाते हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे, निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांसाठी आजच या योजनेचा लाभ घ्या आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा.
📌 महत्वाच्या बातम्या
- जुलैमध्ये बँका तब्बल १३ दिवस बंद! कामाला जाण्यापूर्वी RBI ची सुट्ट्यांची यादी पाहून घ्या
- ‘प्रश्न न विचारता बॉम्ब हल्ला करेन’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा कडक इशारा
- राज-उद्धव एकत्र येणार का? आशा भोसले म्हणाल्या, मला फक्त आशिष शेलार माहिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












