जालना, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतीच एक ऑडिओ क्लिप उघड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख आहे. शिंदे गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच क्लिपच्या टायमिंगवरून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, आता मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत पलटवार केला आहे.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवत, आंदोलनादरम्यान जरांगे झोपण्यासाठी कफ सिरप पीत असल्याचा मोठा आरोप केला होता. याला उत्तर देताना जरांगे यांनी एकेरी भाषेचा वापर करत कदमांवर निशाणा साधला. “तूच बाटली पिऊन बघ कशाची बाटली आहे, तुला कळेल. तुझ्याकडेच बार आहेत, तुला त्याची चव कळते,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. तसेच, कदम हे शिवसेना संपवायला निघाले असल्याची टीकाही त्यांनी केली.
क्लिपच्या टायमिंगवर बोलताना जरांगे यांनी कदम यांनाच सवाल केला. “तारीख कशी तुम्हाला माहिती झाली? ती क्लिप व्हायरल कशी झाली हे देवेंद्र फडणवीसांना विचारा, ते बघतील,” असे ते म्हणाले. तसेच, माध्यमांवरून धमक्या देऊ नयेत आणि मोघम बोलू नये, असा इशाराही त्यांनी दिला. “तू शिंदे साहेबांना संपवू नको, तू चिल्लर माणसासारखा वागायला लागला आहेस,” अशा शब्दांत जरांगे यांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही जरांगे हे सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर पलटवार करताना जरांगे यांनी, “तुझ्या म्हाताऱ्याने काय केलं? तो कोणाची सुपारी घेतो, तुझ्या घरीच सुपारी आहे,” असे सडेतोड उत्तर दिले. आम्ही शिंदेंचा स्वाभिमान असल्याने त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो, पण आमच्यासोबत गद्दार कोण होता ते सांगा, असे आव्हानही त्यांनी दिले.
रामदास कदम म्हणजे ‘क्रॅक जॅक संघटना’ असल्याची खिल्ली जरांगे यांनी उडवली. मराठा समाज आणि एकनाथ शिंदे यांच्यात गैरसमज निर्माण करून मुख्यमंत्र्यांना डॅमेज करण्याचे काम स्वतः कदम करत असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदेंनी त्यांना बोलायला सांगितले नसल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी संजय राऊत यांचे कौतुक केले. “संजय राऊत इमानदार आहेत, ते सकाळी एकदाच बोलतात. त्यांनी जेल भोगली पण ते मागे हटले नाहीत, मात्र कदम खूपच वेडे आहेत,” अशी बोचरी टीका जरांगे यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा हल्लाबोल, जरांगेंवरही गंभीर आरोप
- जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘या तर पारावरच्या गप्पा!’
- एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदमांनीच घेतलीये का? ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांचा पलटवार
Quick Answers
मनोज जरांगे यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख आहे.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवून आंदोलनादरम्यान जरांगे झोपण्यासाठी कफ सिरप पीत असल्याचा मोठा आरोप केला होता.
योगेश कदम यांच्या आरोपावर पलटवार करताना जरांगे म्हणाले, "तुझ्या म्हाताऱ्याने काय केलं? तो कोणाची सुपारी घेतो, तुझ्या घरीच सुपारी आहे."
संजय राऊत हे इमानदार असून ते सकाळी एकदाच बोलतात, त्यांनी जेल भोगली पण ते मागे हटले नाहीत, असे सांगत जरांगे यांनी त्यांचे कौतुक केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








