LIVE

Operation Tiger Live updates : ठाकरे गटाचे खासदार फुटणार? बंड रोखण्यासाठी ओम बिर्ला यांना पत्र

✍️ MHD News 🕐 Last updated: 12:11 PM 📋 9 updates 🔄 30s
🟢 LATEST

"त्या खासदारांना घरात घुसून जाब विचारा!" - सुषमा अंधारे कडाडल्या

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे अत्यंत आक्रमक झाल्या आहेत. पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला असून जनतेला थेट आवाहन केले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांना संकटाच्या काळात सोडून जे खासदार स्वार्थासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत, त्यांना जनतेने घरात घुसून जाब विचारला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला खासदारकी दिली, सन्मान दिला; मग त्यांना काय कमी पडले होते, याचे उत्तर या गद्दारांना द्यावेच लागेल.”

निष्ठावंतांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटातील नेत्यांमधील संताप आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात ग्राउंड लेव्हलवर संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात, सुषमा अंधारेंचे शिक्कामोर्तब

ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आता फुटले आहेत. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतः या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा तळागाळातला आणि कट्टर निष्ठावंत नेता पक्ष सोडत असल्याने ठाकरे गटासाठी ही खूप मोठी राजकीय हानी मानली जात आहे. ऑपरेशन टायगर आता खऱ्या अर्थाने अंतिम आणि निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.

9 पैकी 8 खासदार शिंदे गटात येणार, आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा सर्वात मोठा दावा

शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या राजकीय घडामोडींवर एक खळबळजनक विधान केले आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे ९ पैकी तब्बल ८ लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा थेट दावा त्यांनी केला आहे.

भोंडेकर म्हणाले की, “फक्त एक खासदार सोडून सर्व खासदार आमच्याकडे येत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत राहणारा तो एकमेव खासदार नेमका कोण? तो अरविंद सावंत असतील की अनिल देसाई? याचे उत्तर देणे त्यांनी टाळले.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आजच सर्व ८ खासदार एकाच वेळी येतील असे नाही, पण लवकरच हा मोठा गट शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे सहभागी होईल. भोंडेकर यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना आता प्रचंड उधाण आले आहे.

“प्रत्येक गोष्टीचा हिशेब केला जाईल”, संजय राऊतांचा ‘ऑपरेशन टायगर’वरून इशारा

“नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जातं. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ‘ठाकरे नावा’मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळविला ऑपरेशन टायगर का म्हणता?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

१९ जून रोजी प्रवेशाची शक्यता

शिंदे गटाच्या शिवसेनेचा १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. याच दिवशी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या भव्य मेळाव्यात हे खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव यांची नावे सध्या या चर्चेत आघाडीवर आहेत.

संजय राऊत आणि विरोधकांचे आरोप

या घडामोडींवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला आहे की, खासदारांना विकत घेण्यासाठी पैशांची मोठी ऑफर दिली जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत याला ‘ऑपरेशन टायगर’ ऐवजी ‘ऑपरेशन गिधाड’ म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्रीच दिल्लीला पोहोचले आहेत. या खासदारांसोबत त्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासून आणि कोणतीही तांत्रिक त्रुटी न ठेवता हा प्रवेश पार पडावा, अशी शिंदे गटाची रणनीती आहे.

UBT खासदारांना व्हीप जारी

संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहणे सर्व खासदारांसाठी सक्तीचे करण्यात आले असून पक्षाकडून तसा अधिकृत व्हीप जारी करण्यात आला आहे. गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र

शिवसेना (UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक सविस्तर पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षातील कोणताही गट स्वतंत्र गट म्हणून मान्यता मागण्यासाठी आल्यास त्यांना ती देऊ नये. पक्षावर कोणाचा अधिकार आहे याचा वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कोणतीही एकतर्फी कारवाई करू नये, अशी विनंती सावंत यांनी केली आहे.