टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या संजू सॅमसनने सामन्यानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार स्वीकारताना संजूने धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
संजू अतिशय भावूक होत म्हणाला, “देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिल्यापासून मी नेमक्या याच एका खेळीची वाट पाहत होतो. माझ्या या प्रवासात अनेक चढउतार आले. मी स्वतःवरच अनेकदा शंका घ्यायचो की मी खरंच इथवर पोहोचू शकेन का? पण आजच्या या दिवसासाठी मी देवाचा खूप आभारी आहे.”
या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी दिग्गज खेळाडूंची मदत झाल्याचं त्याने आवर्जून सांगितलं. तो पुढे म्हणाला, “विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यासारख्या दिग्गजांकडून मी खूप काही शिकलो. परिस्थितीनुसार ते आपला खेळ कसा बदलतात, हे मी जवळून पाहिलं आणि त्याचा मला आज प्रचंड फायदा झाला.”
आजच्या संस्मरणीय खेळीबद्दल बोलताना संजूने स्पष्ट केलं की, आज परिस्थिती थोडी वेगळी होती. जेव्हाही तो मोठे फटके मारायला जायचा, तेव्हा दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. त्यामुळे आज त्याने वर्तमानात राहून फक्त ‘मेरिट’वर चेंडू खेळण्यावर भर दिला. संजूच्या मते, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महान आणि अविस्मरणीय दिवस आहे.