प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: गुजरातच्या टॉरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात तब्बल तीन लाख झाडे तोडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल आधीच सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महायुती सरकार या कंपनीला झुकते माप देत असल्याचा आरोप होत असून, या बेसुमार वृक्षतोडीविरोधात दाद मागण्यासाठी स्थानिक नागरिक आज (२५ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
कर्जत तालुक्यातील ‘साई डोंगर’ परिसरात हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपये खर्च आणि ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात आहे. या प्रकल्पामुळे पक्षी आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याबरोबरच डोंगर उतारावरील मृदा संवर्धन, नैसर्गिक जलप्रवाह, पारंपरिक शेती आणि पर्यटनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणवाद्यांनी वर्तवली आहे. जमीनमालकांच्या चिंता आणि पर्यावरण संरक्षणाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सरकारला थेट सवाल करत विचारले की, स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विरोध असताना वन विभागाने कोणाच्या दबावाखाली वृक्षतोडीची परवानगी दिली? नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईपायी महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासगी कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी राज्याचा निसर्ग ओरबाडण्याचा अजेंडा कधी थांबणार, अशी विचारणाही त्यांनी केली.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ असताना भाजप राजवटीने जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न हाती घेतल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली. हिंजवडी मेट्रो आणि गोराईतील मँग्रोव्ह पार्कसारख्या लोकोपयोगी प्रकल्पांसाठी अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना राज्याचे होणारे नुकसान या सरकारला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी तिच्या जीवावर जगत नाही”, माधुरी दीक्षितच्या प्रसिद्धीवर डॉ. श्रीराम नेनेंचे थेट वक्तव्य
- ५०० कोटी बॅगेतून नेता येत नाहीत; श्रीकांत शिंदेंच्या प्रतिक्रियेवर प्रसाद लाड यांचे मोठे विधान
- गोविंदाचं विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट मत; ‘आम्ही हिंदू, आमच्यात ‘घटस्फोट’ हा शब्दच….’








