प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशी गमावली आहे. २८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात कोसळल्याने माजी सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) फलंदाजांच्या कामगिरीवर सडकून टीका केली आहे. या निराशाजनक फलंदाजीला त्याने ‘अन-ऑस्ट्रेलियन’ असे म्हटले आहे.
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. पहिला कसोटी सामना त्यांनी २१४ धावांनी गमावला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात संघ अडचणीत असताना कर्णधार बावुमाच्या शानदार खेळीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात यजमान संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत सामना खिशात घातला.
माजी कर्णधार डेविड वॉर्नरने संपूर्ण ऑस्ट्रेलियन फलंदाजी फळीला धारेवर धरले. ऑस्ट्रेलियन संघ अशा पद्धतीने खेळत नसल्याचे सांगत कसोटी सामन्यात त्यांच्याकडून कोणताही संघर्ष न दिसल्याचे तो म्हणाला. “मी खूप निराश आहे. हे भयंकर आहे आणि अन-ऑस्ट्रेलियन आहे. त्यांच्यात अजिबात संघर्ष दिसला नाही. हे लज्जास्पद आहे. २८८ धावा करून तुम्ही कसोटी सामना आणि मालिका जिंकू शकला असता. मालिका पणाला लागलेली असताना ते अशा पद्धतीने खेळत आहेत.”
वॉर्नर पुढे म्हणाला, “माझ्या मते हे अत्यंत खेदजनक आहे. फलंदाजांनी संपूर्ण मालिकेत गोलंदाजांची निराशा केली आहे. पहिल्या कसोटीत मॅट रेनशॉने नक्कीच संघर्ष दाखवला, पण मला वाटते की इतर फलंदाजांची कामगिरी अतिशय आणि पूर्णपणे लज्जास्पद राहिली आहे.”
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मार्केस अकरमन (९५) आणि एडन मार्करम (७०) यांनी पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर मधल्या फळीत पडझड झाल्याने त्यांचा डाव ३२९ धावांवर आटोपला. या डावात मिचेल स्टार्कने ६ बळी घेतले.
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२९ धावा करत १०० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. जोश इंगलिस (१०२), ॲलेक्स कॅरी (८०), कॅमेरॉन ग्रीन (६५) आणि मॅट रेनशॉ (७०) यांनी या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. मात्र, दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकलटन (१०१) आणि विआन मुल्डर (११५) यांच्या शतकी खेळीमुळे यजमानांना कांगारूंसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
विजयासाठी २८८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर मॅट रेनशॉ बाद झाला, तर त्याच षटकात मार्नस लाबुशेनही केवळ ४ धावा करून माघारी परतला. त्यानंतर त्यांच्या विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस त्यांची अवस्था ७ बाद ६० अशी झाली होती.
कॅमेरॉन ग्रीनने एका बाजूने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण दुपारच्या जेवणानंतर तो २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर नॅथन लायनने कर्णधार पॅट कमिन्ससोबत ४५ धावांची छोटी भागीदारी केली. या डावात लायनने सर्वाधिक ३३ धावा केल्या. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १११ धावांत सर्वबाद झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ग्लेन फिलिप्सने मोडला शाई होपचा विक्रम, भारताविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावांची नोंद
- असं पुन्हा घडणार नाही; सलमान अली आघाचा मोहसिन नक्वी आणि पीसीबीच्या निर्णयावर निशाणा
- रवींद्र जडेजाची वन-डे कारकीर्द संपली? २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत चेतेश्वर पुजाराचा मोठा खुलासा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








