प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपल्या संघात आणि सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. मागील तीन हंगामांत साखळी फेरीच्या पुढे जाण्यात अपयश आल्यानंतर, या पाच वेळच्या चॅम्पियन संघाने सनरायझर्स हैदराबादसोबत (SRH) चार खेळाडूंचा मोठा ट्रेड पूर्ण केला आहे. तसेच, नव्या हंगामासाठी पूर्णपणे नवीन कोचिंग स्टाफचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
या ट्रेडनुसार, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऑस्ट्रेलियाचा जॅक एडवर्ड्स हे सीएसकेमध्ये सामील झाले आहेत, तर वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नॅथन एलिस हैदराबादकडे गेले आहेत. लिव्हिंगस्टोनचा हैदराबादसोबत १३ कोटी रुपयांचा करार होता, मात्र चेन्नईसाठी तो ६ कोटी रुपयांमध्ये खेळेल. दुसरीकडे, पायाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ ला मुकलेला जॅक एडवर्ड्स त्याच्या ३ कोटी रुपयांच्या जुन्याच मानधनावर चेन्नईत दाखल झाला आहे. यामुळे संघाला मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीत अतिरिक्त पर्याय मिळणार आहेत.
एमएस धोनीने निवृत्ती घेतली असून तो आता संघाच्या मेंटॉरची भूमिका बजावणार आहे. ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत राहील. फलंदाजीत संजू सॅमसन हा यष्टिरक्षणाच्या क्षमतेसह आणि अनुभवासह एक महत्त्वाचा पर्याय असेल. याशिवाय, डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबे मिडल ऑर्डरमध्ये ताकद वाढवतील, तर उर्विल पटेल आणि कार्तिक शर्मा हे युवा फलंदाज म्हणून संघात आहेत. गोलंदाजीच्या आघाडीवर अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि गुरजपनीत सिंग या भारतीय वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
मागील काही हंगामातील खराब कामगिरीनंतर सीएसकेने कोचिंग स्टाफमध्येही संपूर्ण खांदेपालट केली आहे. स्टीफन फ्लेमिंग यांच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोहित शर्माची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू अल्बी मॉर्केल आणि इंग्लंडचा माजी फिरकीपटू गॅरेथ बॅटी यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. श्रीधरन श्रीराम (सहाय्यक प्रशिक्षक) आणि जेम्स फॉस्टर (फिल्डिंग कोच) हे त्यांच्या जुन्या जबाबदाऱ्या पार पाडत राहतील.
दुसरीकडे, मायकेल हसी (फलंदाजी प्रशिक्षक), एरिक सिमॉन्स (गोलंदाजी प्रशिक्षक), राजीव कुमार (सहाय्यक प्रशिक्षक), टॉमी सिमेक (फिजिओथेरपिस्ट) आणि ग्रेग किंग (स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच) यांना संघातून मुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२७ साठी सीएसकेकडे कोणताही स्वतंत्र फलंदाजी प्रशिक्षक नसेल. फ्रेंचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, याच कोचिंग ग्रुपवर मुख्य जबाबदारी असेल आणि गॅरेथ बॅटी हे फलंदाजी मेंटॉरची भूमिका सांभाळण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आईचा विनयभंग केल्याचा राग, दौंडमध्ये तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोघांना अटक
- रत्नागिरीत ACB ची मोठी कारवाई; पोर्ट क्लिअरन्सच्या लाचेप्रकरणी मेरीटाईम बोर्डाच्या ‘क्लास वन’ अधिकाऱ्याला बेड्या
- शिवसेना सुनावणी: ॲड. ध्रुव मेहतांचा युक्तिवाद; योगेश कदम ते दादा भुसेंच्या सह्यांचा उल्लेख








