🕒 1 min read
राजकारणातील दिग्गज नेते आणि सिनेसृष्टीतील ‘महानायक’ यांच्यात इतकी घट्ट मैत्री असू शकते, याचा तुम्ही कधी विचार केलाय? राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबत चक्क दोन चित्रपटांत स्क्रीन शेअर केली होती, ही माहिती अनेकांसाठी धक्कादायक असू शकते.
निमित्त होतं मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके ‘अशोक मामा’ म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांच्या ७९ व्या वाढदिवसाचं. ४ जून रोजी त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली. याच दरम्यान छगन भुजबळ यांनी ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Ashok Saraf Birthday
आपल्या पोस्टमध्ये भुजबळांनी लिहिलंय की, अभिनयाच्या आवडीमुळे त्यांना अशोक सराफांसारख्या अष्टपैलू नटासोबत दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यातूनच त्यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली. मामांना मिळालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.
पडद्यावरील ही मैत्री खऱ्या आयुष्यातही किती घट्ट आहे, याचा एक मोठा प्रसंग खुद्द मामांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत पॅरिसमध्ये शिक्षण घेत असताना त्याच्यावर अचानक हल्ला झाला आणि त्याचा पासपोर्ट असलेली बॅग चोरीला गेली होती.
त्यावेळी अनिकेतला तातडीने भारतात येऊन अवघ्या एका आठवड्यात पासपोर्ट आणि व्हिसाचं नव्याने काम करणं भाग होतं. अशा अत्यंत कठीण प्रसंगी छगन भुजबळ अशोक सराफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी केलेल्या या मोलाच्या मदतीमुळेच अशोक सराफ त्यांना नेहमी आपला जवळचा मित्र मानतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
- सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
- जेजुरी गडावरील ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; विक्रम पाचपुते यांची तुकाराम मुंढेंकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












