🕒 1 min read
पुणे – क्रिकेटच्या मैदानात नाव मोठं की काम मोठं? याचं उत्तर सध्या एका २१ वर्षांच्या पोराने आपल्या बॅटने दिलंय. ज्याच्या नावावर काही दिवसांपूर्वी IPL लिलावात फक्त ३० लाखांची बोली लागली होती, त्या पठ्ठ्याने आता भल्याभल्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली आहे. अमेरिकेत जन्मलेल्या पण मनाने पक्का हैदराबादी असलेल्या अमन राव (Aman Rao) याने विजय हजारे ट्रॉफीत इतिहास रचला आहे. त्याने मंगळवारी बंगालविरुद्धच्या सामन्यात नाबाद २०० धावांची (Double Century) खेळी करत सर्वांचे डोळे फिरवले आहेत.
शमी, आकाश दीपलाही सोडलं नाही!
ही खेळी साधीसुधी नव्हती. समोर मोहम्मद शमी, आकाश दीप आणि मुकेश कुमारसारखे टीम इंडियाचे तगडे गोलंदाज होते. पण अमनने कशाचीच पर्वा न करता चौफेर फटकेबाजी केली. १५४ चेंडूत त्याने १२ चौकार आणि तब्बल १३ गगनभेदी षटकार ठोकले. विशेष म्हणजे, डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपलं द्विशतक पूर्ण केलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा तो हैदराबादचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
Who Is Aman Rao?
अमन रावचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिन (Wisconsin, USA) मध्ये झाला आहे, पण तो लहानाचा मोठा हैदराबादमध्ये झाला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईच्या शार्दुल ठाकूरला एकाच ओव्हरमध्ये २४ धावा कुटल्या होत्या, तेव्हाच त्याची झलक दिसली होती. त्याचा हा आक्रमक अंदाज पाहूनच आयपीएल २०२६ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसला आपल्या ताफ्यात घेतलं.
राजस्थानचं नशीब उघडलं!
संजू सॅमसन आणि कुमार संगकारा यांनी नक्कीच सुटकेचा निःश्वास सोडला असेल. कारण, लिलावात स्वस्त मिळालेला हा हिरा आता सोन्यासारखा चमकतोय. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात द्विशतक करणारा तो नववा फलंदाज ठरला आहे. ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल यांच्या पंगतीत आता अमन राव जाऊन बसला आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये हा अमेरिकन-भारतीय खेळाडू काय कमाल करतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विजय हजारे ट्रॉफीत १३ षटकार, १२ चौकार… १५४ चेंडूत २०० धावा! IPL 2026 आधी ‘या’ पठ्ठ्याने ठोकलं द्विशतक
- ‘काँग्रेसमुक्त भारत’ गेलं खड्ड्यात? अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी बांधली ‘गाठ’; एकनाथ शिंदेंना धोबीपछाड!
- वर्ल्डकप गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; खेळाडू संतापली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












