प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: व्यवसाय बंद करताना व्यापाऱ्यांना आणि छोट्या दुकानदारांना जीएसटी नंबर रद्द करण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने २५ नोव्हेंबर रोजी एका नव्या आदेशाद्वारे जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. जीएसटी कौन्सिलच्या शिफारशींनुसार १ डिसेंबर २०२६ पासून हे नवे नियम देशभरात लागू केले जाणार आहेत.
या नव्या बदलानुसार, ज्या व्यावसायिकांचे सर्व व्यवहार आणि कागदपत्रे स्वच्छ आहेत, त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याकडे न जाता थेट ऑनलाइन पद्धतीने आपला जीएसटी क्रमांक रद्द करता येईल. रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी आलेले अर्ज आता दोन वेगवेगळ्या प्रक्रियांमधून हाताळले जातील.
पहिल्या प्रक्रियेनुसार, ज्या व्यापाऱ्यांनी सर्व आवश्यक रिटर्न वेळेत भरले आहेत आणि ज्यांच्याकडे सरकारची कोणतीही थकबाकी नाही, त्यांचा अर्ज थेट ऑनलाइन प्रणालीद्वारे मंजूर केला जाईल. यासाठी कोणताही कर, व्याज, लेट फी किंवा दंड थकीत नसावा आणि विभागाची कोणतीही देय रक्कम बाकी नसावी, या अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. व्यावसायिकाने अर्जात नमूद केलेल्या तारखेपासून रजिस्ट्रेशन रद्द मानले जाईल आणि पोर्टलवरच त्याचे अधिकृत प्रमाणपत्र (FORM GST REG-३८) उपलब्ध होईल.
दुसरी प्रक्रिया थकबाकी किंवा रिटर्न बाकी असलेल्या व्यावसायिकांसाठी लागू असेल. जर एखादा रिटर्न भरायचा राहिला असेल किंवा कर, व्याज, लेट फी व दंडाचा एक रुपया जरी थकीत असेल, तर रजिस्ट्रेशन आपोआप ऑनलाइन बंद होणार नाही. अशा प्रकरणांतील अर्ज थेट जीएसटी अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी पाठवला जाईल. संबंधित अधिकारी संपूर्ण खात्याची पडताळणी करेल आणि त्यानंतरच रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल.
कंपोझिशन स्कीम अंतर्गत नोंदणी असलेल्या छोट्या दुकानदारांनी रजिस्ट्रेशन रद्द करताना आपला FORM GST CMP-०८ पूर्णपणे भरलेला असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. हा हिशोब अपूर्ण राहिल्यास त्यांचाही अर्ज ऑनलाइन प्रणालीतून थेट मंजूर न होता अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी अडकू शकतो.








