प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या अधिवेशनाची तयारी १५ डिसेंबरच्या आधी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तोपर्यंत कोणत्याही मंत्र्याने परदेश दौऱ्यावर जाऊ नये, असे मोदींनी स्पष्ट केले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली. या अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. आगामी अधिवेशनाची नेमकी तारीख आणि कालावधी संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समिती निश्चित करणार आहे.
सध्या अधिवेशन बोलावण्यास होत असलेल्या विलंबावरून विरोधकांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. १३ ऑगस्ट रोजी संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती. याला १०० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी नवीन तारीख जाहीर झालेली नाही. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
लोकसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजे ३६१ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. ५४३ सदस्यांच्या सभागृहात ३ जागा रिक्त असल्याने सध्या ५४० सदस्य आहेत. एनडीएकडे ३२० खासदार असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. विरोधी पक्षातील २६ खासदार फुटल्याने राजकीय समीकरणे बदलली असून, अधिवेशनात डीएमके आणि शरद पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारसंघ पुनर्रचनेवरून दक्षिण भारतीय राज्यांनी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता दूर करण्यासाठी मोदी सरकार सर्व राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावामुळे १९७१ च्या जनगणनेवर आधारित राज्यांमधील प्रतिनिधित्वाचे प्रमाण कायम राहील. मात्र, या विषयावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.








