बिडकीन, किरण काळे पाटील : पोलिसांनी लोहगाव-बिडकीन रोडवरील तोंडोळी गावाजवळ सापळा रचून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. बुधवारी (२५ नोव्हेंबर) झालेल्या या कारवाईत विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉस कारसह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुनील जयराम ढोले (वय ३३, रा. टेंभापुरी, ता. गंगापूर) आणि अलीम अहमद पटेल (वय ३०, रा. जिकठाण, ता. गंगापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. महाराष्ट्रात विक्री, साठा आणि वाहतुकीस बंदी असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूची पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तोंडोळी गावाजवळ सापळा लावून दुपारी सुमारे १ वाजून २० मिनिटांनी येणारी पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची कार पोलिसांनी अडवली.
पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित साठा आढळून आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१६/२०२६ नोंदवला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २७५, १२३, २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरलेली अंदाजे नऊ लाख ५० हजार रुपये किमतीची किया सेल्टॉस कार ताब्यात घेतली. जप्त केलेल्या साठ्यात प्रिमियम राजनिवास पान मसाल्याची ४५६ पाकिटे (६८ हजार ४०० रुपये), ZN-01 जाफरानी जर्दा तंबाखूची ४५६ पाकिटे (४१ हजार ४० रुपये) आणि हिरा पान मसाल्याची २१६ पाकिटे (२७ हजार २१६ रुपये) यांचा समावेश आहे.
याशिवाय रॉयल ७१७ सुगंधित तंबाखूची २१६ पाकिटे (१३ हजार ६०८ रुपये), विमल पान मसाल्याची १०५ पाकिटे (५० हजार ४०० रुपये) आणि V-1 बिग सुगंधित तंबाखूची १०५ पाकिटे (२ हजार १०० रुपये) जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा विभागाने या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. मालाचे उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेते शोधण्यासह आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक राजू तडवी, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वाजेद शेख, नाडे, वाल्मीक निकम, पोलीस कॉन्स्टेबल योगेश वाघमोडे आणि स्वप्नील दिलवाले यांचा समावेश होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- इमर्जिंग आशिया कप २०२६: पहिल्या उपांत्य फेरीत भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’चा थरार, भारताचे पारडे जड
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड तिसरा टी-२० सामना: खेळपट्टी, हवामान, प्लेइंग ११ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
- IND vs NZ 2nd Test: ख्राईस्टचर्च कसोटीसाठी दोन्ही संघ सज्ज, खेळपट्टी आणि हवामानाचा असा असेल अंदाज








