Jalgaon, २५ नोव्हेंबर: जळगाव जिल्ह्यातील एका मजूर कुटुंबाला कामाचे आमिष दाखवून गुजरातमध्ये बोलावून घेत कुटुंबातील ६ जणांना वाहत्या कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ हा प्रकार घडला असून यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी सुरत ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महाराष्ट्रातून सदानंद बदाने या सहआरोपीला अटक केली आहे.
मूळचे जळगावच्या एरंडोल येथील व सध्या शहरातील खंडेराव नगर भागात राहणारे नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील, मुलगा प्रथमेश, हरीश आणि आणखी एक लहान मुलगा व मुलगी असे हे ६ जणांचे कुटुंब होते. ओळखीच्या व्यक्तींनी त्यांना रोजगार देण्याच्या बहाण्याने गुजरातला बोलावले. सुरतच्या दिशेने जात असताना उवा गावाजवळ त्यांची गाडी थांबवून सर्वांना मारहाण करण्यात आली आणि कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आले. या भीषण घटनेत १३ वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावल्याने हे हत्याकांड उघडकीस आले.
या हत्येमागे विमा कंपनीशी संबंधित फसवणुकीचे धागेदोरे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मृत महिला कविता हिचे पहिले पती संजय यांच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देऊन ‘लोंबार्ड आय एस आय’ विमा कंपनीकडे खोटा प्रस्ताव सादर केल्याचा संशय आहे. या प्रकरणी कविता आणि नितीन पाटील यांच्यावर १९ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बनावट विमा प्रकरणाचा भांडाफोड होण्याच्या भीतीतून आणि मृत व्यक्ती या घोटाळ्यातील साक्षीदार असल्याने त्यांना संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बारडोलीचे पोलीस निरीक्षक पी. एन. जाडेजा यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तपासाची माहिती घेतली. गुजरात आणि जळगाव पोलिसांकडून समन्वयाने या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. जळगाव पोलिसांनी कारचालक दयानंद भदाणे ऊर्फ खंड्या याला संशयित म्हणून ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका विमा घोटाळ्याच्या गुन्ह्यात ४ पोलिसांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या ते कारागृहात असून, या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि बारडोलीतील हत्याकांडाचा काही संबंध आहे का, याचाही जळगाव पोलीस कसून तपास करत आहेत.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- ज्या बिसलेरीवर कारवाई, त्यांच्याच बाटल्या FSSAI च्या सेमिनारमध्ये; कंपनीकडून बंदीबाबत स्पष्टीकरण
- ओबीसींचं आरक्षण संपवलं, ८ मंत्री गप्प का? ‘जीवन संपवावं वाटतंय’, लक्ष्मण हाकेंची उद्विग्नता
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट; एसआयटीचे पथक अंतरवालीत, जरांगेंकडून रामदास कदमांच्या चौकशीची मागणी








