पैठण | किरण काळे पाटील: पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन गंभीर घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी रात्री जमावबंदी लागू असताना खुद्द सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्यासमोर दोन गटांत तुफान हाणामारी झाली. एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे पाचोड परिसरात पोलिसांचा (Pachod Crime) धाक उरला आहे का, असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.
सपोनि सचिन पंडित यांच्यासमोरच राडा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8.50 वाजेच्या सुमारास पाचोड येथील हॉटेल निसर्गसमोर दोन गटांत जोरदार वादावादी झाली. मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ करत सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत परिसरात गोंधळ घातला.
जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार नागनाथ पंढरीनाथ केंद्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरून बाळू भालसिंगे, किशोर भालसिंगे, अनिकेत भालसिंगे, अमोल भालसिंगे, शुभम ऊर्फ गजू भालसिंगे, मुरली भालसिंगे, गणेश ऊर्फ गोविंद कडुबाळ गावरे, भागवत बापूराव भुमरे, ओम संतोष भुमरे, अभिषेक ऊर्फ चिलट्या बंडू जाधव, अजय डूकळे, नितीन डूकळे आणि अजय वसंत भुमरे यांच्यासह अन्य 7 ते 8 जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे, ही मारामारी खुद्द सपोनि सचिन पंडित यांच्यासमोरच सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. असे असताना पंडित नेमके कोणाला अभय देत होते का आणि घटनेच्या वेळी पाचोड पोलीस ठाण्याचा कर्मचारी वर्ग नेमका कुठे होता, असे गंभीर प्रश्न आता विचारले जात आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच हे लोक इतकी दादागिरी करत असतील, तर सामान्य जनतेला त्यांचा किती त्रास सहन करावा लागत असेल, हा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
विहामांडव्यात दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की
विशेष म्हणजे, या राड्याच्या एकच दिवस आधी गुरुवारी (19 नोव्हेंबर) विहामांडवा येथे अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणीही पाचोड पोलीस ठाण्यात नवाज रहीमखाँ पठाण आणि नवाज बाबा सय्यद (दोघे रा. विहामांडवा, ता. पैठण) यांच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, धक्काबुक्की, शिवीगाळ, धमकी आणि मुरूम चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवघ्या 24 ते 29 तासांत घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे पाचोड हद्दीत पोलिसांचा धाक उरला आहे का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
तपासाच्या निष्पक्षतेवर आणि राजकीय वरदहस्तावर सवाल
या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव अशोकराव नाईकवाडे करत आहेत. मात्र, ज्या पोलीस अधिकाऱ्यासमोर हॉटेलबाहेर राडा झाला, त्याच अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली होणारा तपास कितपत निष्पक्ष राहील, असा कळीचा प्रश्न उपस्थित होत आहे. जमावबंदी असताना भरवस्तीत हाणामारी आणि दिवसाढवळ्या विनाक्रमांकाच्या वाहनांतून अवैध मुरूम वाहतूक सुरू असताना स्थानिक पोलीस प्रशासन झोपा काढतेय का, असा संताप व्यक्त होत आहे.
या संपूर्ण राड्यामागे आणि अवैध धंद्यांमागे नेमका सूत्रधार कोण आहे, तसेच संबंधित आरोपींना कोणाचा राजकीय वरदहस्त लाभला आहे का, याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पाचोड परिसरात विविध घटनांचे पेव फुटले असून तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
वरिष्ठांची कडक भूमिका, पण स्थानिक पातळीवर लागेबांधे?
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार प्रकाश जाधव यांनी स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांची प्रमुख साथ मिळत असून, कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता ते कायदा व सुव्यवस्था चोखपणे राबवत आहेत.
वरिष्ठ अधिकारी इतकी कठोर भूमिका घेत असतानाही पाचोड ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या विनाक्रमांकाचे हायवा धावतात कसे आणि अधिकाऱ्यांसमोरच राडा होतो कसा, हा मोठा सवाल आहे. जुना चाललेला कारभार आणि त्यात स्थानिक पोलीस प्रशासनाशी असलेले लागेबांधे यामुळेच स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पातळीवर असे प्रकार घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. आता या दोन्ही प्रकरणांत संबंधित आरोपींवर आणि जबाबदारांवर वरिष्ठ पोलीस प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करते, याकडे पैठण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून मुशफिकुर रहीम बाहेर
- हिवाळ्यात वाढणाऱ्या सांधेदुखीवर नियंत्रण कसं मिळवायचं? तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय
- पुणे विमानतळ रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ४० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी गजाआड








