प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: ढाका येथे शुक्रवारी झालेल्या पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. सततच्या पावसामुळे नाणेफेक न होताच अंतिम सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी पाकिस्तानला या स्पर्धेचा एकमेव विजेता घोषित केले.
सामनाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध करत भारतीय अंध क्रिकेट संघाने ब्लाइंड क्रिकेट आशिया चषकाच्या ट्रॉफी वितरण समारंभावर बहिष्कार टाकला. दोन्ही अंतिम स्पर्धकांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्याऐवजी पाकिस्तानला एकमेव विजेता ठरवल्याने हा वाद उफाळून आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास अनेकदा दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाते. मात्र, या स्पर्धेत सामनाधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा रनरेट (धावगती) इतर संघांच्या तुलनेत चांगला असल्याचे कारण देत त्यांना एकमेव विजेता म्हणून घोषित केले.
भारतीय अंध क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. सामनाधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता पाकिस्तानला ट्रॉफी दिलचा आरोप भारतीय संघ प्राधिकरणाने केला. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (कॅबी – CABI) ने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) खात्यावर एक व्हिडिओ शेअर करून बहिष्कार टाकण्याचे कारण स्पष्ट केले.
कॅबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाकिस्तानला पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया चषक २०२६ चा एकमेव विजेता घोषित करण्याच्या निर्णयाचा कॅबी तीव्र निषेध करते. कॅबी हा निर्णय पूर्णपणे फेटाळत असून भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजेते म्हणून मान्यता दिली पाहिजे यावर ठाम आहे.”
कॅबीने स्पर्धेच्या तांत्रिक नियमावलीतील ‘कलम २७’ कडे लक्ष वेधले. त्यानुसार, सामना टाय (समान) झाल्यास संघाच्या कामगिरीशी संबंधित कोणत्याही आकडेवारीचा विचार न करता दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्याचा नियम आहे. कॅबीने वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (WBCC) च्या तांत्रिक समितीसमोर हा मुद्दा मांडला होता, ज्यांनी सुरुवातीला दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यास सहमती दर्शवली होती.
मात्र, डब्ल्यूबीसीसी (WBCC) चे अध्यक्ष आणि पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष सुलतान शाह यांनी तांत्रिक समितीचा हा निर्णय फेटाळला आणि सामनाधिकाऱ्यांवर पाकिस्तानला विजेता घोषित करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा कॅबीने त्यांच्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे अंतिम सामना न खेळताच पाकिस्तानला ट्रॉफी देण्यात आली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘अकवान’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह ८ राज्यांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट
- मोदी मंत्रिमंडळाचा २३ नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता; शमिक भट्टाचार्य यांच्यासह बड्या नेत्यांना संधीची चर्चा
- शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; फेब्रुवारीत निकालाची शक्यता








