मुंबई, 20 नोव्हेंबर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुढील चार आठवड्यांत महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्याचा प्रभाव वाढला आहे.
गुरुवारी रात्री अधिक शक्तिशाली झालेले ‘अकवान’ चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून ताशी १९ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (२० नोव्हेंबर) दुपारी हे वादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर, प्रामुख्याने गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर असू शकतो, जो काही ठिकाणी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी रात्री ११.३० वाजता हे वादळ आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून आग्नेयेला १७० किमी, विशाखापट्टणमपासून पूर्व-आग्नेयेला २०० किमी, तर ओडिशाच्या गोपाळपूरपासून दक्षिणेकडे २४० किलोमीटर अंतरावर होते. विशाखापट्टणम किनारपट्टीवर सध्या ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. विशाखापट्टणमवरील चक्रीवादळाचा थेट धोका टळला असला तरी आज उत्तर आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रातही काही भागांत पाऊस होऊ शकतो, असे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. १९ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ओडिशा आणि गंगा नदीच्या पश्चिम बंगाल खोऱ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. तसेच झारखंड, आसाम, केरळ व तामिळनाडूतही पावसाचा अंदाज आहे. २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे.
३ ते १० डिसेंबर या कालावधीत दक्षिण भारतातील अनेक भागांसह महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र, तसेच जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर १० ते १७ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाचे संकेत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोदी मंत्रिमंडळाचा २३ नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता; शमिक भट्टाचार्य यांच्यासह बड्या नेत्यांना संधीची चर्चा
- शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; फेब्रुवारीत निकालाची शक्यता
- पोटरीच्या दुखापतीमुळे टेम्बा बावुमा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर








