प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: २०१८ च्या ‘सँडपेपर गेट’ (चेंडू कुरतडणे) प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या नव्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ॲरॉन फिंच यांनी संघातील गोलंदाजांची पाठराखण केली आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना फिंच यांनी स्पष्ट केले की, चेंडूवर सँडपेपर किंवा इतर कोणतीही बाह्य वस्तू वापरली गेली आहे का, हे गोलंदाजांना ओळखणे अत्यंत कठीण असते.
मालिकेदरम्यान मैदानावरील पंचांनाही चेंडूवर काही गैरप्रकार झाल्याचे ओळखता आले नव्हते, याकडे फिंच यांनी लक्ष वेधले. फिंच म्हणाले, “रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी चेंडूची एक बाजू घासली जात आहे का, हे पाहण्यासाठी गोलंदाज नेहमी चेंडू तपासत असतात. पॅट कमिन्सनेही याबद्दल उघडपणे सांगितले आहे की, चेंडू फेकून किंवा क्रॉस-सीम गोलंदाजी करून तो नैसर्गिकरित्या खराब केला जाऊ शकतो.” चेंडूवर निश्चितपणे कशाचा वापर झाला आहे, हे ओळखणे गोलंदाजांसाठी फार कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीला उस्मान ख्वाजा यांच्या ‘सब्र’ (Sabr) या आत्मचरित्रामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला. सँडपेपरच्या वापराबाबत गोलंदाज आणि कोचिंग स्टाफसह संपूर्ण ड्रेसिंग रूमला माहिती होती आणि पोर्ट एलिझाबेथ येथील आदल्या कसोटीतही असा प्रकार घडला होता, असा खळबळजनक दावा ख्वाजा यांनी केला. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’मध्ये कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने ४,००० शब्दांचे निवेदन प्रसिद्ध केले. आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी २०१८ च्या चौकशीत आपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याची कबुली त्याने दिली.
“संपूर्ण संघाला याची कल्पना होती,” असा दावा बॅनक्रॉफ्टने केला. त्याने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि यष्टीरक्षक टिम पेन यांची नावे घेत आरोप केला की, चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यास मदत मिळत आहे की नाही याबाबत हे खेळाडू अभिप्राय देत असत. मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन आणि गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड साकर हे पोर्ट एलिझाबेथ येथील चर्चेत उपस्थित होते, असाही दावा त्याने केला. तसेच, साकर यांनीच आपल्याला सँडपेपरचा वापर सुरू ठेवण्यास आणि माध्यमांना पिवळ्या टेपबाबत खोटी माहिती देण्यास सांगितले होते, असे बॅनक्रॉफ्टने नमूद केले.
या आरोपांनंतर पॅट कमिन्सने सिडनीमध्ये ६८ मिनिटांची पत्रकार परिषद घेत ख्वाजा यांचे दावे फेटाळून लावले. हे दावे ‘१०० टक्के चुकीचे’ आणि ‘निर्थक बकवास’ असल्याचे सांगत, मैदानात सँडपेपर नेले जाणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना गोलंदाजांना नव्हती, असे कमिन्सने स्पष्ट केले. मिचेल स्टार्कनेही पत्रकारांशी बोलताना हे आरोप फेटाळले असून, २०२१ मधील गोलंदाजांच्या संयुक्त निवेदनावर आपण अजूनही ठाम असल्याचे तो म्हणाला.
दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरने ‘सत्य सांगितल्याबद्दल’ ख्वाजा आणि बॅनक्रॉफ्टचे कौतुक केले आहे. तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये केलेली चौकशी घाईघाईत आणि सदोष असल्याचा आरोप वॉर्नरने केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघाचा १२ वा खेळाडू असलेला माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज चॅड सायर्स यानेही ख्वाजा आणि बॅनक्रॉफ्टच्या दाव्यांना दुजोरा दिला आहे.
या नव्या घडामोडींवर १८ नोव्हेंबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणतीही नवीन अधिकृत चौकशी किंवा अतिरिक्त कारवाई करण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र, २०१८ च्या दौऱ्यातील खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना आपली बाजू खाजगीत मांडण्यासाठी एक स्वतंत्र आणि गोपनीय मंच उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. मार्च २०१८ मध्ये केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॅनक्रॉफ्ट पिवळा सँडपेपर वापरताना कॅमेऱ्यात कैद झाला होता, त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन खेळाडूंवर प्रदीर्घ बंदी घातली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉ. रुचिका शर्मांचे वादग्रस्त दावे; ‘९० टक्के युद्धे मराठ्यांविरुद्ध’
- ‘इस्लाई फाउंडेशन’ ते ‘शहाजी पाटील’ फेक अकाउंट; पैगंबर शेख यांच्यावर बदनामीचे आरोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप
- ४००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणार! ‘रामायण’ चित्रपटाबाबत अभिनेत्री लारा दत्ताचा मोठा दावा








