मुंबई, 19 नोव्हेंबर: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नावाने प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये हिंदू देवता आणि धार्मिक चिन्हांचा वापर झाल्याप्रकरणी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (सेन्सॉर बोर्ड) आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथील वकील प्रदीप नाईक यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील सीबीएफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत एक लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनासोबत सुमारे २७ सेकंदांची एक व्हिडिओ क्लिप जोडण्यात आली आहे. या क्लिपच्या सुरुवातीलाच एका टेबलावरील पत्रिकेवर श्री गणेशाचे चित्र दिसत असून, पुढच्या काही दृश्यांमधील पार्श्वभूमीवरील सजावट एखाद्या मंदिरासारखी किंवा देवस्थानासारखी भासत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही दृश्ये नेमक्या कोणत्या प्रसंगात वापरली आहेत, याची सखोल पडताळणी करण्याची मागणी ॲड. नाईक यांनी केली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या कथित फसवणुकीचे चित्रण करताना हिंदू देवतांच्या प्रतिमा, धार्मिक पत्रिका किंवा मंदिरांचा असा वापर करणे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या चित्रणामुळे त्या व्यक्तीचा संबंध हिंदू धर्माशी जोडला जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. हिंदूंच्या श्रद्धा आणि देवतांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची भावना भाविकांमध्ये असून, या दृश्यांचा संदर्भ सोडून प्रसार झाल्यास हिंदू धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांना आयते कोलीत मिळेल आणि समाजाविषयी तुच्छता वाढेल, असा दावा निवेदनात केला आहे.
अशोक खरात हे कोण आहेत, त्यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत आणि त्यातून काय निष्पन्न होईल, या सर्व बाबी कायदेशीर तपास आणि न्यायप्रक्रियेच्या माध्यमातून ठरतील, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ एका व्यक्तीवरील आरोपांच्या आडून हिंदू धर्माची बदनामी केली जाऊ नये. तसेच, श्री गणेशासह इतर देवता, धार्मिक पत्रिका आणि मंदिरांची अवमानकारक मांडणी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका ॲड. नाईक यांनी मांडली आहे.
या संपूर्ण प्रकरणी ॲड. नाईक यांनी सेन्सॉर बोर्डासमोर चार प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, संबंधित व्हिडिओ क्लिपमधील दृश्ये प्रमाणनासाठी आलेल्या चित्रपटात आहेत का, याची खातरजमा करून संवाद आणि प्रसंगांचा काय परिणाम होतो ते तपासावे. दुसरी मागणी, लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हिंदू धार्मिक प्रतिमांचा वापर अवमानकारक आढळल्यास ती दृश्ये वगळण्याची किंवा बदलण्याची कारवाई करावी. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, रील आणि इतर प्रचार साहित्यातील अशा प्रकारांचीही दखल घ्यावी, ही तिसरी मागणी आहे. तर, चित्रपटाला प्रमाणपत्र दिले असल्यास त्याचा क्रमांक, दिनांक आणि या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती पोचपावतीसह द्यावी, अशी चौथी मागणी करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई विमानतळाचे दोन्ही रनवे गुरुवारी ६ तास राहणार बंद; विमान वाहतुकीवर होणार परिणाम
- श्रीलंका अ विरुद्ध अफगाणिस्तान अ: एमर्जिंग आशिया कप २०२६ सामन्याची ड्रीम ११ प्रेडिक्शन आणि खेळपट्टीचा अहवाल
- IPL 2027 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? पाहा सर्व १० फ्रँचायझींचे बजेट आणि रिक्त जागा








