मुंबई, 18 नोव्हेंबर: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानजनक उल्लेख असल्याचा आरोप करत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आज या पुस्तकातील दोन पाने फाडली. याचवेळी उद्धव ठाकरे हे सदर पुस्तक भेट देत असल्याचा फोटोही फाडण्यात आला. तसेच, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे आणि मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा आरोप झाल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला.
या वादानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत शायना एनसी यांना बोलावून घेतले आणि याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांचा फोटो फाडला नसल्याचा खुलासा करत शिंदे म्हणाले की, “शायना एनसी यांनी मला प्रत्यक्षात घडलेला प्रकार दाखवला. तो मूळ फोटो बाळासाहेब हे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारतानाचा होता. शायना यांनी केवळ मणिशंकर अय्यर यांचा फोटो आणि त्यांचे तोंड फाडले आहे. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्यामुळे शायना एनसी असू देत नाहीतर अन्य कोणीही, कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांचा अपमान कदापी करू शकणार नाही.”
यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सोनिया आणि राहुल गांधी यांनी सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान केला असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे सांगत त्यांनी पुस्तक फाडण्याच्या कृतीचे समर्थन केले. “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसू शकतात? पुस्तकातील दोन पाने सावरकरांच्या विरोधात असताना त्यावर हे ब्र काढत नाहीत, उलट त्यांच्या गळ्यात गळे घालून बसतात, याचा आम्ही निषेध करतो,” असे शिंदे म्हणाले.
सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत असून त्यांचा वारंवार अपमान करणे ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची विचारधारा घेऊन पुढे चाललो असल्याने जनतेने आम्हाला स्वीकारले आहे, तर या लोकांना तीन वेळा नाकारले आहे, असा टोला त्यांनी लगावला. आता त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही, लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवल्याने केवळ खोटेनाटे आरोप करून बदनाम करण्याचे काम ते करत आहेत, अशी टीका करत, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे असा सल्लाही शिंदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेला दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तेव्हाच ही ताकद दाखवली असती तर…’ ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ वादावर दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर संताप
- हवामान खात्याचा अलर्ट: उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात गारठा, तर ‘अक्वान’ वादळामुळे विदर्भात पावसाची शक्यता
- पायाच्या स्नायूला दुखापत झाल्याने टेम्बा बावुमा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मैदानाबाहेर








