मुंबई, 18 नोव्हेंबर: सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना विधान भवनात बोलावून घेतले होते. या भेटीनंतर शिंदेंनी घडलेल्या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया देत शायना एनसी यांची पाठराखण केली आहे. “बाळासाहेब आमचे दैवत असून कोणताही शिवसैनिक त्यांचा कधीही अपमान करू शकत नाही आणि करणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉंगिंग जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात वीर सावरकर यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधींचे पुस्तक भेट दिल्याच्या फोटोची प्रत फाडून यावेळी निषेध नोंदवला जात होता. याच वेळी शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांच्या फोटोला चप्पल मारत असल्याचा फोटोही फाडला. मात्र, संजय निरुपम यांनी ही चूक लक्षात आणून देताच त्यांनी तो अर्धवट फाडलेला फोटो लगेच खाली ठेवला.
या घटनेसंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेल्या प्रकारानंतर शायना एनसी यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले असून त्यांनी तो फोटोही मला दाखवला. त्या फोटोमध्ये मणिशंकर अय्यर यांचे तोंड फाटले आहे. त्यामुळे शायना एनसी किंवा कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांचा अपमान करू शकत नाही.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. सोनिया गांधींच्या पुस्तकातून आणि यापूर्वी राहुल गांधींकडूनही जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केल्याचा घणाघात त्यांनी केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, असे सांगतानाच पुस्तकातील अपमानावर ठाकरे सेना निषेधाचे साधे एक वाक्यही बोलत नाही, असा टोला शिंदेंनी लगावला.
दरम्यान, शायना एनसी यांच्या कृतीचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेत उमटले. या प्रकारावरून ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली असून महापालिकेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच महासभेत निषेधाचा प्रस्ताव मांडत विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शायना एनसी असू, नाहीतर कोणीही; बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- ‘तेव्हाच ही ताकद दाखवली असती तर…’ ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ वादावर दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर संताप
- हवामान खात्याचा अलर्ट: उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात गारठा, तर ‘अक्वान’ वादळामुळे विदर्भात पावसाची शक्यता








