प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या आरोपांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब हे आमचे दैवत असून कोणताही शिवसैनिक त्यांचा अपमान करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, फाटलेला फोटो बाळासाहेबांचा नसून मणिशंकर अय्यर यांच्या तोंडाचा भाग फाटल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून शिवसेनेवर बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना काही पाने फाडताना हा प्रकार घडल्याचा दावा होत होता. या प्रकरणावर शायना एनसी यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “तो फोटो मी बघितला आहे. त्यात बाळासाहेब हे मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारताना दिसत आहेत. जो फोटो फाटला, त्यात मणिशंकर अय्यर यांचे तोंड फाटले आहे, त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान झालेला नाही.”
विरोधकांवर टीका करताना शिंदे यांनी सांगितले की, लोकांनी त्यांना नाकारून घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे खोटे आरोप करून बदनाम करण्याचे काम सुरू असून, ‘पब्लिक है सब जानती है’ असा टोला त्यांनी लगावला. उगाच राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वेळोवेळी अपमान करण्यात आला आहे. मात्र, अशा वेळी ठाकरे सेना निषेधाचा एक शब्दही न काढता काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप; पुण्यात ठाकरे गट आक्रमक, मुठा नदीत शिंदे-शायना एनसींच्या पोस्टरचे विसर्जन
- बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या वादावर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; शायना एनसींची पाठराखण करत म्हणाले…
- शायना एनसी असू, नाहीतर कोणीही; बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया








