प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात लक्षणीय घट होत आहे. दिवाळीनंतर राज्यात पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी कडक ऊन असे दुहेरी हवामान पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा १२ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये थंडीचा प्रभाव आणि संमिश्र वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १७ नोव्हेंबरच्या ताज्या अपडेटनुसार राज्यातील विविध भागांतील हवामानात मोठे बदल नोंदवले गेले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली असून मागील काही दिवसांत पारा १२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. १७ नोव्हेंबरला या भागात कमाल तापमान २९, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. पुढील दोन-तीन दिवसांत कमाल व किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सकाळच्या वेळी गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिकमध्येही किमान तापमानात सतत घट होत असून पारा १४ अंशांपर्यंत घसरला आहे. तेथे कमाल तापमान ३१ अंशांच्या आसपास असून आगामी दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. या किनारपट्टीच्या भागात कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दिवसा उष्ण आणि काहीसे ढगाळ वातावरण राहणार असून, १८ नोव्हेंबर रोजी किमान तापमानात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही. या भागात कोरडे व उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज असून १७ नोव्हेंबरला कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. येथे पहाटे गारवा असला तरी दिवसा उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० आणि किमान तापमान १७ अंशांच्या आसपास राहील. १८ नोव्हेंबर रोजी या दोन्ही तापमानांत सुमारे एक अंशाने घट होण्याची शक्यता आहे. पहाटे-रात्री जाणवणारा गारठा आणि दुपारी असणारी उष्णता या दुहेरी हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात प्रसादात भेसळ? ४ दुकानांना टाळे, ८५० किलो मिठाई जप्त
- ‘मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात’, इंदुरीकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
- अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला रोहित पवारांच्या कारखान्याचा धूर जबाबदार? भाजपचा गंभीर आरोप








