पैठण (किरण काळे पाटील): वडापाव आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एका पित्याने स्वतःच्या पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याची अत्यंत धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील नांदर शिवारात घडली आहे. मंगळवारी (सायंकाळी ७ च्या सुमारास) हा प्रकार घडला असून, पाचोड पोलिसांनी बापाला ताब्यात घेतले आहे. कालव्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोन्ही भावंडांचा अद्याप शोध लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने मंगळवारी सायंकाळी मुलांना वडापाव आणि चॉकलेट खाऊ घालण्याचे तसेच स्कूटीवरून फिरायला नेण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेऊन पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या चिमुकल्यांनी ‘पप्पा, आम्ही मरू… असे करू नका ना!’ अशी आर्त विनवणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकून दिले.
याच वेळी कालव्यावरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शेतकऱ्यांच्या दिशेने दगडफेक करत शिवीगाळ केली. यानंतर शेतकऱ्यांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित बापाला (सोमनाथ रोडगे) ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या पित्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, कालव्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलांचा शोध लागलेला नव्हता. पोलिस आणि नातेवाइकांकडून शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आई आणि नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. या अमानुष घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पाचोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ: आक्रमक सेलिब्रेशन भोवलं, आयसीसीकडून वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला समज
- संजय राऊत यांच्या अवमान याचिकेवर ८ डिसेंबरला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश
- हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय? आहारात करा ‘या’ ५ पौष्टिक पदार्थांचा समावेश








